Chetan Vadnere on Sayali Sanjeev: लवकरच ‘लपंडाव’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत अभिनेता चेतन वडनेरे, अभिनेत्री कृतिका देव आणि अभिनेत्री रुपाली भोसले हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच ‘स्टार प्रवाह’ पुरस्कार सोहळ्यात अभिनेता चेतन वडनेरे व सायली संजीव यांनी एकत्र हजेरी लावली होती. त्यांनी एकत्र एका मालिकेसाठी लूक टेस्ट दिली होती. एकत्र काम करण्याबाबत, तसेच एकमेकांच्या कामाबाबत वक्तव्य केले होते, त्यामुळे त्यांना एकत्र पाहण्यास प्रेक्षक उत्सुक होते. मालिका कधी येणार याची प्रतीक्षादेखील प्रेक्षकांना होती.
मात्र, काही दिवसांपूर्वी ‘लपंडाव’ मालिकेचा प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केला. या प्रोमोमध्ये चेतन वडनेरेसह रुपाली भोसले आणि कृतिका देव प्रमुख भूमिकेत असल्याचे पाहायला मिळाले.
सायली संजीव मालिकेत का नाही?
आता स्टार प्रवाह वाहिनीवर गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे, त्यामध्ये या नवीन मालिकेतील कलाकारांनीदेखील हजेरी लावली आहे. यादरम्यान चेतन वडनेरे आणि कृतिका देव यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत सायली संजीव मालिकेत का नाही, असा प्रश्न चेतन वडनेरेला विचारण्यात आला.
चेतन म्हणाला, “खरंतर ही ती मालिकाच नाहीये, जी मी आणि सायली करणार होतो. ती वेगळी मालिका होती. आता ती हिंदीमध्ये आली. हिंदीत मालिका आली तर ती लगेच मराठीमध्ये करता येत नाही. ती चॅनेलची काही कारणे आहेत. हे सगळं बोलण्याकरता मी फार अधिकृत माणूस नाही. पण, चॅनेलकडून ती मालिका थोडी पुढे ढकलण्यात आली. मग दुसरा एक शो होता, त्या शोमध्ये मला घेतले. आता शो बदलला तर सगळं कास्टिंगच बदलतं, म्हणून कृतिकाची एन्ट्री झाली. पण, तो प्रोजेक्ट वेगळा होता, हा प्रोजेक्ट पूर्णपणे वेगळा आहे.”
कृतिका देव मालिकेबाबत म्हणाली की, १५ सप्टेंबरपासून मालिका प्रदर्शित होणार आहे. ही वेगळ्या धाटणीची मालिका आहे. या मालिकेतील पात्रं खूप इंटरेस्टिंग आहेत, प्रेक्षकांना ही मालिका खूप आवडेल.
दरम्यान, चेतन वडनेरेने याआधी स्टार प्रवाह वाहिनीवर ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता, तर रुपाली भोसले ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत संजना या भूमिकेत दिसली होती. कृतिका देव पहिल्यांदाच स्टार प्रवाह वाहिनीवर काम करत आहे. आता ‘लपंडाव’ मालिकेतून हे कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य कऱणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.