Sairaj Kendre Dance On Govinda’s Song : ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत छोट्या सिंबाची ( अमोल ) भूमिका साकारणाऱ्या साईराज केंद्रेच्या हटके डान्स व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. “आमच्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्यामुळे बालकलाकार साईराज केंद्रेला महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रियता मिळाली. तो रातोरात स्टार झाला आणि यानंतर चिमुकल्या साईराजला मालिकेत काम करण्याची मोठी संधी मिळाली.
‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका जरी संपली असली, तरीही साईराज केंद्रेने साकारलेला सिंबा आजही प्रत्येकाच्या लक्षात आहे. सध्या साईराज इन्स्टाग्रामवरील विविध ट्रेंडिग गाण्यांवर रील्स व्हिडीओ बनवत असतो. त्याचं अकाऊंट त्याचे आई-बाबा हँडल करतात. या बालकलाकाराने नुकताच गोविंदाच्या एव्हरग्रीन बॉलीवूड गाण्यावर सुंदर डान्स केल्याचं पाहायला मिळतंय.
बॉलीवूडचा ९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेता गोविंदाचं ‘आपके आ जाने से’ हे गाणं त्याकाळी सर्वत्र तुफान सुपरहिट झालं होतं. हे गाणं ‘खुदगर्ज’ सिनेमातील आहे. हा चित्रपट १९८७ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि हे गाणं गोविंदा आणि नीलम यांच्यावर चित्रीत झालं होतं. आज ३८ वर्षांनंतरही ‘आपके आ जाने से’ या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. चिमुकल्या साईराज केंद्रेने नुकताच या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
साईराजने डान्स करताना ‘सेम टू सेम गोविंदा’सारखे हावभाव केले आहेत. याशिवाय गाण्यातील हूकस्टेप्स सुद्धा साईराजने हुबेहूब केल्या आहेत. साईराजचा हा ‘आपके आ जाने से’ गाण्यावरील डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
साईराजच्या डान्सचं नेटकऱ्यांकडून कौतुक
साईराजच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “सेम गोविंदासारखा अभिनय करतोय”, “गोविंदा आला रे आला…”, “सिंबा अरे तू कसला जबरदस्त डान्स करतोस”, “लयभारी डान्स”, “मोठा होऊन खूप मोठा हिरो होणार”, “वॉव साई बाळा कमाल केलीस…एक नंबर डान्स”, “साईराज आमचा सुपर डान्सर”, “खूपच गोड- हिरो नंबर वन” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, साईराज महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकलेल्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेने १५ मार्च २०२५ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने जवळपास अडीच वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं होतं. आता साईराज नव्या कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.