‘बिग बॉस १८’ मुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे चुम दरांग (Chum Darang). चुम दरांगही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. चुम दरांग ही ईशान्य भारतातील असून तिच्या दिसण्याबद्दल अनेकांनी तिची मस्करी केली आहे आणि खिल्ली उडवली आहे. याबद्दल स्वत: चुम दरांगने नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केलं. यावेळी अभिनेत्रीने सुरुवातीला अनेक लोक तिला मोमो तसंच कोरोना विषाणू म्हणत असल्याचे सांगितलं.

“पूर्वी लोक मला मी मोमोसारखी दिसते अशा कमेंट करायचे”

झूम टीव्हीशी साधलेल्या संवादात चुम दारांग असं म्हणाली, “ईशान्येकडील लोकांना स्वीकारणे खूप महत्वाचे आहे. कारण मी खूप वंशवादाचा सामना केला आहे. पण मला त्या कथांमध्ये खोलवर जायचे नाही कारण असे दिसते की मी बळी पडत आहे. खरं तर, काही लोकांना वंशवाद आणि भेदभावाची खरोखरच जाणीव नसते आणि काही जण ते जाणूनबुजून करतात. पूर्वी लोक मला मी मोमोसारखी दिसते अशा कमेंट करायचे. नंतर माझ्या दिसण्यामुळे लोक मला कोरोना व्हायरस म्हणायचे.”

“आम्ही वेगळे दिसत असू, पण मी एक भारतीय आहे”

अभिनेत्रीला मोमो म्हटल्या गेलेल्या प्रतिक्रियेबद्दल तिने आधी एक आठवण शेअर केली होती. २०१८ मध्ये जेव्हा चुम दरांग मुंबईत आली होती, तेव्हा मुंबईतील एका मॉलमध्ये गेली असता तिथल्या काही लोकांनी तिला ‘मोमो’ आणि ‘चाउ चाउ’ म्हणून चिडवले होते. याबद्दल ती म्हणाली होती की, “मला फक्त एवढेच हवे आहे की, या देशातील लोकांना मी याच देशातली आहे हे कळावं. आम्ही वेगळे दिसत असू, पण मी एक भारतीय आहे.”

‘बधाई दो’ चित्रपटामध्ये झळकली होती चुम दरांग

दरम्यान, चुम दरांगबद्दल सांगायचं झालं तर, ती एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. चुम दरांग भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव यांच्याबरोबर ‘बधाई दो’ चित्रपटामध्ये झळकली होती. यातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. याशिवाय तिने संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातही काम केलं होतं.

चुम दरांगने अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून केलंय काम

शिवाय चुम ‘पाताल लोक’ गाजलेल्या या वेब सीरिजमध्येही झळकली आहे. चुम दरांग २०१४ मध्ये नॉर्थ ईस्ट डिवा स्पर्धेची फायनलिस्ट ठरली होती. २०१५ मध्ये ती मिस हिमालय स्पर्धेमध्ये दुसऱ्या विजेतीपदाची दावेदार ठरली होती. त्यानंतर २०१७ मध्ये चुमने मिस एशिया वर्ड स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.