सध्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यामुळे जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताना पाहायला मिळत आहे. पण एक वर्षही पूर्ण न होता या मालिका ऑफ एअर होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘कुन्या राजाची गं तू रानी’ या मालिकेने प्रेक्षकांना निरोप घेतला. या मालिकेला वर्षही पूर्ण झालं नव्हतं. अशातच आता आणखी एक लोकप्रिय मालिका ऑफ एअर झाली आहे. आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला आहे.

अवघ्या आठ महिन्यांत प्रेक्षकांचा निरोप घेणारी ही लोकप्रिय मालिका म्हणजे ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’. अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सकपाळ यांच्या जीवनावर आधारित असलेली ही मालिका १५ ऑगस्ट २०२३पासून सुरू झाली होती. या मालिकेचे दोन पर्व पाहायला मिळाले. पहिल्या पर्वात गोष्ट चिंधीची दाखवली. त्यानंतर १५ ऑक्टोबरपासून ‘चिंधी बनली सिंधु’ हे पर्व सुरू झालं.

हेही वाचा – पूजा सावंतनंतर ‘ही’ मराठी अभिनेत्री चढणार बोहल्यावर, देवक विधीचे फोटो आले समोर

‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत बालपणीच्या सिंधुताई म्हणजेच चिंधीची भूमिका बालकलाकार अनन्या टेकवडेने उत्तमरित्या साकारली होती. तसेच या पर्वात अभिनेत्री प्रिया बेर्डेंही झळकल्या होत्या. त्यांनी सिंधुताईंच्या आजी म्हणजे पार्वती साठे यांची भूमिका निभावली होती. याशिवाय किरण मानेंनी सिंधुताईच्या आयुष्यातला बापमाणूस अभिमान साठे आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री योगिनी चौकने सिंधुताईच्या आईची भूमिका साकारली होती. त्यानंतर दुसऱ्या पर्वात मोठ्या सिंधुताई सकपाळ यांच्या भूमिकेत अभिनेत्री शिवानी सोनार झळकली. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पण आज, २३ मार्चला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला.

हेही वाचा –अभिनेत्री तेजश्री प्रधानची बहीण कोण आहे? काय काम करते? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेची जागा आता ‘इंद्रायणी’ ही नवी मालिका घेणार आहे. येत्या सोमवार, २५ मार्चपासून ही नवी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत इंदू या प्रमुख भूमिकेत बालकलाकार सांची भोईर पाहायला मिळणार आहे. याशिवाय अभिनेत्री अनिता दाते, संदीप पाठक, स्वानंद बर्वे, आयुष उलगड्डे, राघव घाडगे हे महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.