‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘देवमाणूस- मधला अध्याय’ या थ्रिलर मालिकेबद्दल सध्या प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दर आठवड्याला या मालिकेत काही ना काही रोमांचक गोष्टी घडत आहेत. प्रेम, स्वार्थ, गुन्हा आणि कौटुंबिक संघर्ष यांचा अफलातून संगम असलेली ही मालिका रोजच्या भागांमधून उलगडत जाणारी रहस्य, उत्कंठावर्धक वळणं आणि पात्रांमधील गुंतागुंत प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे.

सध्या मालिकेत लाली आणि गोपाळच्या लग्नाचा सीक्वेन्स चालू आहे. यात एकाचवेळी अनेक प्रसंग घडणार आहेत; ज्यामुळे मालिकेच्या संपूर्ण कथेला नवं वळण मिळणार आहे. एकीकडे संपत्तीच्या वाटपावरून सुधाकर आणि अजित यांच्यात जोरदार वाद होतो. अजितला इतक्या सहज जमीन मिळाल्याचं पाहून सुधाकर चिडतो आणि त्यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण होतं. याचदरम्यान, पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या विधी सुरु होतात. यावेळी लालीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो. पण, हा आनंद किती काळ टिकणार हे कोणीच सांगू शकत नाही.

दुसरीकडे, अजित एक धक्कादायक पाऊल उचलतो. लग्न आटोपल्यावर गोंधळाच्या आदल्या रात्री मनीषाच्या मदतीने तो मॅकला गुपचूप गाडतो. रात्रभर मेहनत करून पहाटेपर्यंत तो हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न करतो आणि वेळेवर पूजेसाठी घरीही पोहोचतो. पण अजितच्या या वागणुकीवर संशयाची छाया लवकरच पडणार आहे.

मालिकेत लालीची भूमिका साकारणाऱ्या सोनम म्हसवेकर याबद्दल सांगते, “या लग्नासाठी आमच्या शूटिंगच्या वाड्यापुढे सुंदर मंडप उभा केला गेलाय. मेहंदी, घाणा भरणे, चुडा भरण्याचा कार्यक्रम, हळद, लग्न हे सर्व तिथेच शूट झालं. पूर्ण पारंपरिक पद्धतीने गोपाळ अन् लालीचं लग्न शूट होतंय. रोज मला नवरी म्हणून छान लूक मध्ये तयार केलं जातंय. खरं सांगू तर मला या पारंपरिक पद्धती, रिती, गाणी या सगळ्याचं फार कुतूहल आहे. मला मालिकेमधली लग्न फार आवडतात. तब्बल ८ ते १० दिवस आमच्या लग्नाचं शूट होतंय. संपूर्ण युनिटचा उत्साह पाहून शूट करायला अजूनच मजा येतेय.”

“मला एक किस्सा सांगायला आवडेल. आम्ही सगळ्यांनी मिळून शूटिंग पूर्ण झाल्यावर ‘नवरी नटली’ गाण्यावर मध्यरात्री डान्स व्हिडीओ बनवला होता. मध्यरात्री आम्ही ते Reel शूट केलं होतं. जेव्हा किरण म्हणजेच गोपाळचा एक क्लोज सीन लागला होता तेव्हा दिग्दर्शक सरांना विनंती करून आम्ही तो व्हिडीओ शूट केला होता. सरांनी सुद्धा आम्हाला थोडा वेळ दिला आणि सर आम्हाला तो व्हिडीओ शूट करताना पाहून खूप हसत होते.” असं सोनमने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘देवमाणूस’ मालिकेमध्ये एक नवा थरारक टप्पा सुरू होणार आहे. अजितचा गुन्हा उघडकीस येणार का? मनीषा खरं सांगणार का? गोपाल आणि लालीचं सुखाचं संसार सुरू होणार की त्यातही अडथळे येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळतील. ‘देवमाणूस- मधला अध्याय’ ही मालिका दररोज रात्री १० वाजता ‘झी मराठी’वर प्रसारित केली जाते.