Kiran Gaikwad shares post: सध्या लहानापासून मोठ्यांपर्यंत आणि सामान्यांपासून ते नामांकित व्यक्तींपर्यंत जवळजवळ सर्वजण सोशल मीडिया या माध्यमाचा वापर करतात. सोशल मीडियाचा काहीजण मनोरंजनासाठी, काहीजण बिझनेससाठी वापर करतात. तर कलाकार त्यांची कला जगापर्यंत पोहोचावी यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात.
सोशल मीडिया हे अनेकांसाठी एक असा मंच ठरला आहे, जो सर्वांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत मदत होते. सोशल मीडियाचे काही फायदे असले तरी काही तोटेदेखील आहे. अनेकदा सोशल मीडियामुळे वेळही वाया जातो.
आता अशाच कारणामुळे देवमाणूस फेम अभिनेत्याने इन्स्टाग्राम काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाड सध्या त्याच्या देवमाणूस-मधला अध्याय या मालिकेमुळे चर्चेत आहे. त्याची गोपाळ ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ही भूमिका नकारात्मक असली तरीही गोपाळ हे पात्र मात्र लोकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरले आहे.
सर्वांसमोर चांगली कामे करणारा, संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला धावून जाणारा, प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालणारा हा गोपाळ खरा तर एक गुन्हेगार आहे. तो गरजू लोकांना फसवतो. विशेषत: सुंदर, काहीतरी अडचणी असणाऱ्या स्त्रियांचा विश्वास तो जिंकतो. त्यांच्याकडील पैसे व दागिने घेतो आणि त्यांना मारुन टाकतो. तो ही कामे अशा पद्धतीने करतो की कोणालाही त्याच्यावर संशय येणार नाही.
“माझा खूप वेळ…”
गोपाळ ही भूमिका अभिनेता किरण गायकवाडने साकारली आहे. अभिनेत्याने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत काही काळासाठी इन्स्टाग्राम बंद ठेवणार असल्याचे सांगितले आहे. ही पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले, ” योग्य वेळ वापरता आली तर सोशल मीडिया चांगले आहे.”
अभिनेत्याने पुढे लिहिले, “माझा खूप वेळ सोशल मीडियावर जातोय, असे लक्षात आले म्हणून काही काळासाठी (कायमचे नाही) माझ्या ऑफिशियल हँडल्सवरून रजा घेतोय. भेटूया लवकरच. खूप खूप प्रेम”, असे लिहित अभिनेत्याने इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया माध्यम काही काळासाठी बंद केले आहे.
नेटकरी म्हणाले…
आता यावर चाहत्यांनी भन्नाट कमेंट् केल्या आहेत. काहींनी त्याच्या मालिकेचा, मालिकेतील काही लोकप्रिय डायलॉगदेखील कमेंटमध्ये लिहिले आहेत. “गोपाळजी काय झालं?”, “सर तुमची आठवण येईल पण, निर्णय छान आहे”, “का सर”, “माझीसुद्धा तशीच समस्या आहे”, “गोपाळजी तुम्हाला नवीन पाखरु मिळालं आहे. तिचा खून होईपर्यंत तुम्ही व्यग्र असणार, आम्ही समजू शकतो. देवमाणूसमध्ये उत्तम काम केलं आहे”, “गंमत अशी गंमत करत असतो मी अधून मधून”, “आता तुम्ही डॉक्टरकी सोडली”, “दादा, मी सुद्धा सोशल मीडिया बंद करतो”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहे.





दरम्यान, देवमाणूस या मालिकेचा आणि किरण गायकवाडचा चाहतावर्ग मोठा असल्याचे पाहायला मिळते.
