Devmanus fame Kiran Gaikwad: ‘देवमाणूस – मधला अध्याय’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. देवीसिंग ऊर्फ अजितकुमार ऊर्फ गोपाळ त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि भरपूर पैसे मिळवण्याच्या लोभामुळे अनेकांना जीवे मारत असल्याचे, लोकांचे खून करत असल्याचे दिसते. तो मुख्यत्वे स्त्रियांना लक्ष्य बनवीत असल्याचे पाहायला मिळते.

विशेष बाब म्हणजे गोपाळ लोकांचे खून करीत असला तरी समाजात त्याची प्रतिमा चांगली आहे. तो लोकांना अशा परिस्थितीत मदत करतो, ज्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. त्यामुळे लोकांना तो देवमाणूस वाटतो. तो काही वाईट करेल, असे लोकांना वाटत नाही. त्यामुळे तो जेव्हा गुन्हा करतो, त्यावेळी त्याला तो गुन्हा लपवणे सोपे जाते. आजूबाजूचे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्याचा तो फायदा घेतो.

याआधीदेखील या ‘देवमाणूस’चे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आता तिसरा सीझनदेखील लोकप्रिय ठरताना दिसत आहे. देवमाणूस – मधला अध्याय या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड प्रमुख भूमिकेत दिसत आहे.

किरण गायकवाड काय म्हणाला?

देवमाणूस या मालिकेतून किरण गायकवाडला मोठी लोकप्रियता मिळाली. किरण गायकवाड सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सेटवरील अनेक फोटो, व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. नुकतेच अभिनेत्याने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचे पाहायला मिळाले.

हे फोटो रात्रीच्या वेळेत काढल्याचे दिसत आहे. ट्रॅक्टरवर बसलेला, चेहऱ्यावर वैतागलेले भाव, शूटिंगसाठी लाइट, असे त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे. हे फोटो शेअर करताना, “खरं तर या फोटोंचा अन कॅप्शनचा काही संबंध नाही. गाणं आवडलंय म्हणून लावलं आहे आणि फोटोसुद्धा आवडलेत म्हणून पोस्ट करत आहे”, असे त्याने म्हटले आहे.

पुढे किरणने लिहिले, “पहाटे ४ ला थंडगार पाण्यात सलग ३ दिवस भिजत होतो. या फोटोंकडे पाहिल्यानंतर अजूनही अंगात थंडी भरते.”

गोपाळ गंगाला मारतो, त्यावेळच्या सीनदरम्यानचे हे फोटो असल्याचे ट्रॅक्टर आणि कपड्यांवरून दिसत आहे. आता हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांसह अभिनेत्याच्या पत्नीनेदेखील कमेंट केल्याचे दिसत आहे.

किरण गायकवाडची पत्नी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने कमेंट करीत लिहिले, “माझा नवरा भिजतोय, कोणीतरी छत्री धरा.”

तर चाहत्यांनीदेखील कमेंट्स केल्याचे दिसत आहे. “देवमाणूस”, “आमचा देवमाणूस”, “खूप छान अभिनय”, “एक गोळी कायमचा आराम”, अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तर एकाने लिहिले, “ड्युप्लिकेट गोपाळ तू भिजून फार मोठं काम केलं नाही. त्या बिचाऱ्या गंगाला मारून टाकलं आहे आणि भिजण्याचं कौतुक सांगतोय”, अशा कमेंटस् पाहायला मिळत आहेत.

आता गंगाला मारल्यानंतर देवीसिंग ऊर्फ गोपाळचे पुढचे पाऊल काय असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.