‘झी मराठी’ वाहिनीवर ‘देवमाणूस – मधला अध्याय’ ही मालका लवकरच सुरू होणार आहे. या पूर्वी या मालिकेचे दोन भाग येऊन गेले आहेत. दोन्ही भागांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. या मालिकेतून अभिनेता किरण गायकवाड घराघरात पोहोचला. यामध्ये तो मुख्य भूमिकेत झळकला होता. डॉ. अजितकुमार देव ही भूमिका त्याने साकारली होती. त्याचं हे पात्र चांगलंच गाजलं होतं. किरणच्या भूमिकेव्यतिरिक्त या मालिकेतील अजून एका भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. ती भूमिका म्हणजे अजितकुमारवर सारखी नजर ठेवणारी सरू आजी.

‘देवमाणूस’मध्ये अभिनेत्री रुक्मिनी सुतार यांनी सरू आजीची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. त्या खऱ्या अर्थाने या मालिकेमुळेच प्रसिद्धीझोतात आल्या. अशातच आता ‘देवमाणूस’च्या नवीन भागातही त्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. यामध्ये त्या सरू आजीची जुळी बहीण नरू आजीची भूमिका साकारणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

रुक्मिनी सुतार यांनी ‘राजश्री मराठी शोबझ’ला मुलाखत दिली, यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. परंतु, घरची परिस्थिती तेव्हा फार बिकट होती. आम्ही पुण्यात राहायचो. माझं माहेर पुणे आहे. सातवी पर्यंतचं शिक्षण झालं होतं आणि नंतर वयाच्या १५ व्या वर्षीच लग्न झालं. माझे पती सुतार होते. लग्नानंतर मुलं झाली आणि पुढे मी बालवाडीमध्ये शिक्षिका म्हणून काम केलं. लग्नापूर्वी माझं फक्त सातवी पर्यंतचं शिक्षण झालं होतं. मात्र लग्नानंतर ज्या बालवाडीत काम करायचे तिथल्या एका बाईंच्या सल्ल्यानुसार मी दहावीची परिक्षा दिली आणि त्यात पास झाले. तेव्हा आम्ही साताऱ्यात राहायचो आणि आमची जमीन पाण्यात गेल्याने माझ्या घरात मी दहावी शिकलेली असल्याने मला तिकडे सरकारी नोकरी मिळाली.”

“लग्नानंतर नोकरी, मुलं असं आयुष्य सुरू होतं. परंतु, मला कलेची खूप आवड होती आणि माझी इच्छाशक्ती पाहून आमच्या ओळखीचे एक सर होते जे शाळेत नाटक बसवायचे, त्यांनी मला त्या नाटकासाठी विचारलं. मी त्यात काम केलं आणि नंतर अशी २-३ नाटकं केली. त्या सरांच्या बऱ्याच ओळखी असल्याने त्यांनी काही ठिकाणी माझं नाव सुचवलं मग मी तेव्हा बऱ्याच नाटाकांमध्ये, चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका केल्या. ‘माहेरची साडी’, ‘पहिली शेर दुसरी सव्वाशेर’, ‘दबंग’, यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका केल्या. पंरतु, माझ्या पतींनी मला नंतर या क्षेत्रात काम करायचं नाही असं सांगितलं. तेव्हा मी त्यांचं ऐकलं नाही आणि चोरुन शनिवार-रविवार मी तेव्हा शूटिंगमध्ये काम करायचे. परंतु, घरुन जास्त विरोध व्हायला लागल्याने पुढे १०-१२ वर्षे मी याक्षेत्रात काहीच काम केलं नाही. तेव्हा फक्त नोकरी करायचे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“‘क्राइम डायरी’साठी एक दिवस विचारणा झाली आणि तेव्हापासून पुन्हा कामाला सुरूवात झाली, त्यानंतर ‘लागीर झालं जी’मध्ये मी एक भूमिका केली आणि मग मला त्यांनी ‘देवमाणूस’ मालिकेत सरू आजी या भूमिकेसाठी विचारलं,” असं त्या म्हणाल्या. देवमाणूस’ मालिकेतील त्यांच्या गाजलेल्या भूमिकेबद्दल सांगताना म्हणाल्या, “कधी कधी मलाच विश्वास बसत नाही की मी ही भूमिका करत आहे. आणि आज इतके लोक मला ओळखतात. ही सगळी परमेश्वराची कृपा आहे.”