Devmanus Madhla Adhyay Marathi Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर जून महिन्यात गाजलेल्या ‘देवमाणूस’ मालिकेचा तिसरा भाग सुरू करण्यात आला. यामध्ये अभिनेता किरण गायकवाड प्रमुख भूमिका साकारत आहे. सध्या मालिकेत प्रेक्षकांना गोपाळ आणि लालीची लगीनघाई पाहायला मिळत आहे. थाटामाटात मेहंदी सोहळा पार पडल्यावर आता ‘देवमाणूस’ मालिकेत गोपाळ-लालीचा हळदी समारंभ पाहायला मिळणार आहे.
हळदी समारंभात ‘देवमाणूस’च्या संपूर्ण टीमने ट्रेंडिंग गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. सध्या सोशल मीडियावर “खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली… नवरी नटली, काल बाई सुपारी फुटली” हे गाणं तुफान ट्रेंड होत आहे. लग्नसमारंभात वऱ्हाडी मंडळी या गाण्यावर नवरा-नवरीसह डान्स करत असल्याचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. हाच ट्रेंड आता ‘देवमाणूस’ मालिकेच्या टीमने सुद्धा फॉलो केला आहे.
गोपाळ आणि लालीसह ‘देवमाणूस’ मालिकेमधील सगळेच कलाकार या ट्रेंडिंग गाण्यावर थिरकले आहेत. किरण गायकवाडने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत यावर “बानू नवरी नटली” असं कॅप्शन दिलं आहे. नेटकऱ्यांनी सुद्धा या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
“जमतंय की तुम्हाला”, “एकदम कडक डान्स”, “एक नंबर व्हिडीओ”, “अण्णा नाईक पण या व्हिडीओमध्ये हवे होते”, “कमाल डान्स केलात” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.
दरम्यान, ३१ ऑगस्ट २०२० मध्ये ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘देवमाणूस’ ही मालिका सुरू झाली होती. खेड्यातील लोक डॉक्टरला देवमाणूस मानतात, त्याचा आदर करतात. पण, तो सर्वांचा कसा फायदा उचलतो याची गोष्ट मालिकेत पाहायला मिळाली होती. पहिल्या भागाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर ‘झी मराठी’ने ‘देवमाणूस २’ ची घोषणा केली. १० सप्टेंबर २०२२ रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या दोन वर्षांत ‘देवमाणूस’ मालिकेची क्रेझ घराघरांत निर्माण झाली होती. त्यामुळेच वाहिनीने नुकताच या मालिकेचा तिसरा भाग सुरू केला आहे.