Zee Marathi Devmanus Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘देवमाणूस – मधला अध्याय’ ही थ्रिलर मालिका या जून महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. मूळ ‘देवमाणूस’ मालिकेचा हा तिसरा भाग आहे. यापूर्वीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. यामुळेच ‘झी मराठी’ वाहिनी आणि निर्माती श्वेता शिंदेने ‘देवमाणूस – मधला अध्याय’ या नव्या पर्वाची घोषणा केली. सध्या ही मालिका एका लोकप्रिय अभिनेत्याच्या एन्ट्रीमुळे चर्चेत आली आहे.

नव्या पर्वात अजितकुमार गोपाळचं रुप घेऊन सर्वांच्या भेटीला आला आहे. नुकताच या मालिकेत अजितकुमारने गंगाचा खून केल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय गेली कित्येक वर्षे तो अनेक महिलांची फसवणूक करत असतो. या सगळ्याचा छडा लावण्यासाठी आता मालिकेत एक नवीन एन्ट्री होणार आहे. यापूर्वी हे अभिनेते देवमाणूसच्या दुसऱ्या भागात सुद्धा झळकले होते. खरंतर, ‘देवमाणूस’ म्हणजेच किरण गायकवाड असं एक समीकरण तयार झालं आहे. पण, यात एन्ट्री घेणारे हे लोकप्रिय अभिनेते कोण आहेत जाणून घेऊयात…

‘देवमाणूस’चा खेळ खल्लास करण्यासाठी मालिकेत येणार आहेत मार्तंड जामकर. ते एन्ट्री घेताना म्हणतात, “जो कोणी स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहतो ते मला खपत नाही. आता मी कोणाला सोडणार नाहीये.” याच इन्स्पेक्टर मार्तंड जामकरची भूमिका मालिकेत लोकप्रिय अभिनेते मिलिंद शिंदे साकारणार आहेत.

आजवर त्यांनी ‘तू तिथे मी’, ‘वादळवाट’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये कामं केलेली आहेत. आता ते देवमाणूसमध्ये पुन्हा एकदा एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता मार्तंड जामकर विरुद्ध गोपाळ यांची अनोखी जुगलबंदी प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळेल. आता गोपाळ म्हणजेच अजितकुमार आहे हे सत्य जामकर शोधणार की, त्याआधीच अजितकुमार वेगळं पाऊल उचलणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.

दरम्यान, ‘देवमाणूस – मधला अध्याय’ हा विशेष भाग २५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता प्रसारित केला जाईल. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आता खरी मजा येणार”, “माझे आवडते अभिनेते…”, “आता खरी मजा येईल ही मालिका बघायला…. मस्त एन्ट्री” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या प्रोमोवर केल्या आहेत.