टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर हिला अलीकडेच स्टेज २ लिव्हर कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्याचवेळी तिचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिमने सोशल मीडियावर त्याच्या पत्नीच्या शस्त्रक्रियेची माहिती शेअर केली आहे.
शोएबने चाहत्यांना माहिती दिली की, दीपिकाची शस्त्रक्रिया १४ तास चालली. तिची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आता तिची प्रकृती सुधारत आहे. तिला आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले आहे.
कठीण परिस्थिती असूनही दीपिका आणि तिचा पती शोएब इब्राहिम यांनी रुग्णालयाच्या खोलीत साधेपणाने आणि शांततेत ईद साजरी केली. शोएबने ईदच्या खास क्षणांची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
रुग्णालयात केली ईद साजरी
काल ७ जून रोजी सर्वांनी मोठ्या थाटामाटात ईद साजरी केली असताना, शोएब इब्राहिमने त्याची पत्नी दीपिका कक्करबरोबर रुग्णालयात ईद साजरी केली. शोएबने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ईद साजरी करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “दीपिका आणि माझ्यासाठी पप्पांकडून ईदी आली आहे. ईद मुबारक.” चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आहे. या कठीण काळात दीपिकाचे संपूर्ण कुटुंब तिच्याबरोबर उभे आहे.
६ जून रोजी शोएबने एक ब्लॉग शेअर केला, ज्यामध्ये त्याने चाहत्यांना दीपिकाच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली आणि तिच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले. त्याने दीपिकासाठी प्रार्थना केल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. शोएब म्हणाला, “उद्या ईद-उल-अजहा आहे आणि आज इतक्या शुभ दिवशी, दीपिका आयसीयूमधून बाहेर आहे. ती आयसीयूमधून बाहेर आली आहे आणि आमच्याबरोबर आहे, याबद्दल मी खरोखर आभारी आहे. ती तीन दिवस आयसीयूमध्ये होती आणि शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती सुधारत आहे. संध्याकाळी डॉक्टरांनी तिला खोलीत हलवण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया मोठी असल्याने ती काही दिवस येथेच राहील, ती १४ तास ओटीमध्ये होती.”
शोएब इब्राहिमने सोशल मीडियावर त्याच्या ब्लॉगद्वारे चाहत्यांबरोबर पत्नीच्या आजाराची बातमी शेअर केली होती. शोएबने सांगितले होते की, दीपिकाला बऱ्याच काळापासून पोटात दुखत होते, त्यानंतर त्याला कळले की अभिनेत्रीच्या यकृतात टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर आहे. बायोप्सीनंतर त्याला कळले की अभिनेत्री स्टेज २ लिव्हर कॅन्सरने ग्रस्त आहे.