Disha Pardeshi new Project After Lakhat Ek Amacha Dada: ‘मुसाफिरा’, ‘प्रेम पहिलं वहिलं’ या चित्रपटांतून अभिनेत्री दिशा परदेशी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अभिनेत्री मॉडलिंगसुद्धा करते. मात्र, लाखात एक आमचा दादा या मालिकेतून दिशा घराघरात पोहोचली.
दिशा परदेशी ‘या’ प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस
झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या लोकप्रिय मालिकेत दिशाने तुळजा ही भूमिका साकारली होती. त्या भूमिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात स्वत:चे स्थान निर्माण केले. सूर्या व तुळजाची जोडी लोकप्रिय ठरली. मात्र, तिच्या आरोग्याच्या समस्यांमुळे तिने ही मालिका सोडली. एका मुलाखतीत दिशाने तिला यू.टी.आय. (UTI) हा आजार झाल्याचा खुलासा केला होता. डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला होता. म्हणून ही मालिका सोडली, असे तिने सांगितले होते. तसेच सध्या ती बरी असून, तिने काम सुरू केल्याचेही दिशाने सांगितले होते.
आता दिशा एका नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा प्रोजेक्ट म्हणजे एक म्युझिक व्हिडीओ आहे. नुकताच त्याच्या गाण्याचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘बरस पावसा बेधुंद’, असे या म्युझिक व्हिडीओचे नाव आहे. फुलवा खामकर यांनी हा म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शन केले आहे; तर निर्मिती सोमया प्रॉडक्शन अँड एंटरटेन्मेंटने केली आहे.
या म्युझिक व्हिडीओमध्ये दिशा परदेशी व दिशा काटकर दिसणार आहे. यूट्यूबवर नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे. आज हा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित होणार आहे. आता दिशाच्या या नवीन कामाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच आगामी काळात ती कोणत्या मालिका, चित्रपट, वेब सीरिज किंवा म्युझिक व्हिडीओंमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेबद्दल बोलायचे तर लहानपणीच अचानक आई सोडून गेल्यानंतर आपल्या चार बहिणींची आणि वडिलांची काळजी घेणाऱ्या सूर्यादादाची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळते. बहिणींना आईच्या प्रेमाची, मायेची कमी भासू नये, यासाठी सूर्या सातत्याने प्रयत्न करतो. बहिणीदेखील त्याच्यावर तितकेच प्रेम करतात. त्याचा आदर करतात. आता त्याची आई परत आली आहे, मात्र, खरे कारण माहित नसल्याने सूर्याचा तिच्यावर राग आहे. या सगळ्यात तुळजा सूर्याला वेळोवेळी साथ देते. आता दिशाने मालिका सोडल्यानंतर अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकरने तुळजा ही भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचेदेखील प्रेक्षक कौतुक करताना दिसतात.