५१ वा इंटरनॅशनल एमी अवॉर्ड सोहळा न्यूयॉर्कमध्ये पार पडला. निर्माती एकता कपूरला प्रतिष्ठित इंटरनॅशनल डायरेक्टरेट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या सोहळ्यात प्रसिद्ध लेखक दीपक चोप्रा यांच्या हस्ते एकताला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळवणारी एकता ही पहिली भारतीय महिला चित्रपट निर्माती ठरली आहे. या सोहळ्यात जिम सरभ (रॉकेट बॉईज) आणि शेफाली शाह (दिल्ली क्राइम २) आपापल्या कॅटेगरीमध्ये पराभूत झाले. तर वीर दासला त्याचा नेटफ्लिक्स स्पेशल शो ‘वीर दास: लँडिंग’साठी बेस्ट कॉमेडी अवॉर्ड मिळाला.

वीर दासने पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी शेअर केली. “भारतासाठी, भारतीय विनोदासाठी. या अविश्वसनीय सन्मानासाठी एमीचे आभार,” असं वीरने कॅप्शनमध्ये लिहिलं. त्याने अवॉर्डबरोबरचे फोटोही शेअर केले आहेत.

पुरस्कार जिंकल्यावर एकता कपूरने व्यक्त केल्या भावना

पुरस्कार जिंकल्यानंतर एकता म्हणाली, “प्रतिष्ठित एमी डायरेक्टरेट अवॉर्ड मिळाल्याचा मला आनंद आहे. जागतिक स्तरावर सन्मानित झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. मला नेहमीच इतरांना गोष्टी सांगायच्या होत्या. कारण त्यांच्या माध्यमातून प्रेक्षक मला ऐकतात, पाहतात. गोष्टींच्या माध्यमातून मला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. मी प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञ आहे. त्यांच्यामुळे मला टीव्ही, चित्रपट आणि ओटीटीच्या क्षेत्रात बदल करण्यास संधी मिळाली. मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट अनेक स्तरावर प्रेक्षकांशी कनेक्ट होण्याचा दुवा बनली. या प्रवासात जी अनपेक्षित वळणं मिळाली ती भारतातील लोकांच्या प्रेमाचं प्रतिक आहे. मी खूप ऋणी आहे. मी माझ्या कामाद्वारे प्रेक्षकांवर सकारात्मक प्रभाव पाडत राहीन.”

दरम्यान, इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेसचे अध्यक्ष आणि सीईओ ब्रूस एल पेसनर यांनी एका निवेदनात म्हटले होतं, “एकता कपूरने बालाजीला मार्केट लीडरशिपसह भारतातील टेलिव्हिजन कंटेंट इंडस्ट्रीतील आघाडीच्या मनोरंजन माध्यमापैकी एक बनवले आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या मालिका आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसह तिचं हे काम संपूर्ण भारतासह दक्षिण आशियातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आहे. आम्ही तिची उल्लेखनीय कारकीर्द आणि टीव्ही इंडस्ट्रीवरील प्रभावाला आमच्या डायरेक्टरेट अवॉर्डने सन्मानित करण्यास उत्सुक आहोत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
ekta kapoor
पुरस्कारासह एकता कपूर

एकता कपूरने बालाजी टेलिफिल्म्सच्या बॅनरखाली ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘कहानी घर घर की’, ‘कुसुम’, ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘कसौटी जिंदगी की,’ यासह अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांची निर्मिती केली. तिला टेलिव्हीजन क्वीनही म्हटलं जातं. बालाजी टेलिफिल्म्सने आतापर्यंत तिच्या अनेक मालिकांच्या माध्यमातून कलाकारांना त्यांचं कौशल्य दाखविण्याची संधी दिली आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपट व वेब सीरिजही बनवल्या आहेत.