लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री व अभिनेता हितेन तेजवानीची पत्नी गौरी प्रधानने तिच्या एका खास मैत्रिणीची भेट घेतली आहे. गौरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. गौरीची मैत्रीण ही एकेकाळी लोकप्रिय अभिनेत्री होती, पण नंतर तिने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला आणि नोकरी करू लागली. गौरी प्रधानच्या या मैत्रिणीचं नाव मयूरी कांगो आहे. मयूरी व गौरी दोघी एकत्र डिनरला गेल्या होत्या, असं गौरीने शेअर केलेल्या फोटोत दिसतंय. मयूरी जेव्हा अभिनयक्षेत्र सोडून अमेरिकेला गेली होती, त्यापूर्वी गौरीबरोबर राहायची. दोघीही फ्लॅटमेट होत्या.
गौरी प्रधानने मयूरीबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. “माझ्या forever व्यक्तीबरोबर डिनर – Worth the Wait,” असं कॅप्शन गौरीने या फोटोला दिलं आहे.
गौरी व मयूरीचा फोटो

‘नसीम’, ‘बेताबी’, ‘होगी प्यार की जीत’ आणि ‘मेरे अपने’ या चित्रपटांमध्ये काम करून तत्कालीन औरंगाबादमध्ये जन्मलेल्या मराठमोळ्या मयूरीला प्रसिद्धी मिळाली होती. ‘पापा कहते हैं’ या चित्रपटातील मयूरीचं ‘घर से निकलते ही’ हे गाणं खूप गाजलं होतं. तसेच मयूरीने तिने ‘नर्गिस’, ‘कहीं किसी रोज’, ‘डॉलर बहू’, ‘किट्टी पार्टी’, ‘कुसुम’, ‘करिश्मा’ आणि ‘क्या हादसा क्या हकीकत’ या मालिकांमध्ये काम केलं होतं. काही सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर व मालिका केल्यानंतर मयूरीने अभिनय सोडून उच्च शिक्षण घ्यायचं ठरवलं.
मयूरीने २००३ मध्ये एनआरआय उद्योगपती आदित्य ढिल्लनशी लग्न केलं आणि सिनेइंडस्ट्रीला रामराम ठोकला. ती पतीबरोबर अमेरिकेला स्थायिक झाली. मग मयूरीने एमबीए केलं आणि नोकरी करू लागली. मयूरी आता गुगल इंडियामध्ये इंडस्ट्री हेड आहे.
मयूरीने अभिनय क्षेत्राप्रमाणेच कॉर्पोरेट क्षेत्रातही आपल्या कामाची छाप पाडली. मयूरीने गुगलमध्ये रुजू होण्यापूर्वी पब्लिसिस ग्रुपच्या ग्लोबल डिलिव्हरीचे सीईओ म्हणून काम केलं आहे.
दुसरीकडे, गौरी प्रधानने एकता कपूरच्या क्योंकि सास भी कभी बहू थी २ मधून पुन्हा टीव्हीवर कमबॅक केलं आहे. गौरीने अनेक वेब सीरिज व चित्रपटांमध्येही काम केलं आहे.