Bigg Boss Marathi Fame Actress : ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाची प्रेक्षकांसह कलाकारांमध्येही खूप क्रेझ असल्याचे पाहायला मिळते. अशातच आता लवकरच हिंदी ‘बिग बॉस’ही सुरू होणार आहे. हिंदी असो व मराठी ‘बिग बॉस’मध्ये गेल्यानंतर कलाकार विशेष चर्चेत येतात. ‘बिग बॉस’ मराठी फेम अभिनेत्रीने नुकतीच हिंदी ‘बिग बॉस’मध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. गायत्रीने ‘बिग बॉस’नंतर इतरही काही रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. अशातच आता तिने ‘बिग बॉस’ हिंदीतही जायचं आहे, असे सांगितले आहे. तिने नुकतीच ‘अल्ट्रा मराठी’ला मुलाखत दिली. त्यामध्ये अभिनेत्रीला ‘बिग बॉस’बद्दल विचारण्यात आले होते.
गायत्री दातारने व्यक्त केली हिंदी ‘बिग बॉस’मध्ये जाण्याची इच्छा
गायत्रीला “पैसे कमावण्याचे साधन म्हणूनसुद्धा तू रिअॅलिटी शोकडे पाहिलं होतंस आणि आता इतक्या वर्षांनतर तुझी ‘बिग बॉस’ हिंदीत जाण्याचीही इच्छा आहे.” याबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर गायत्री म्हणाली, “हो. मी ‘बिग बॉस’मध्ये भाग घेतला. त्यापूर्वी मी कधीच ते पाहिलं नव्हतं. त्यामुळे मी ‘बिग बॉस’मध्ये जशी आहे, तशीच वागले.” पुढे ती म्हणाली, “बिग बॉसच्या आधी मला आर्थिकदृष्ट्या काही अडचणी आल्या नव्हत्या. पण येईल ते काम मी करीत होते. कारण- पुढे काम नाही आलं तर आणि घराचं भाडं, पैशांची बचत या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या आधी माझ्याकडे काही पर्याय नव्हते.”
गायत्री याबाबत पुढे म्हणाली, “मी ‘बिग बॉस’मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कारण- मला वाटलं की, जे काही मानधन मला त्यातून मिळेल त्यामुळे कुठेतरी आर्थिक स्थिरता येईल. त्यामुळे जरी मी जिंकले नाही तरी माझ्याकडे पर्याय असतील काम निवडण्यासाठी. कारण- मला वेगवेगळ्या ऑडिशन देता येतील. मला काही वर्कशॉप करायचे होते. कारण- मला काम करताना कळायचं की, हे मला येत नाहीये किंवा हे अजून चांगल्या प्रकारे केलं जाऊ शकतं. पण, सतत पैसे कमावण्यासाठी काम करत राहावं लागतं आणि या सगळ्यात मला ते नाही करता आलं.”
“त्यामुळे या सगळ्याचा विचार करता मला असं वाटलं की, ‘बिग बॉस’मध्ये जाणं हा माझ्यासाठी योग्य निर्णय आहे आणि तो खरंच योग्य ठरला. कारण- त्यातून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यानंतर मी वर्कशॉप केलं. छान छान ऑडिशन्स दिल्या, काही कथा वाचल्या, काही लिहिल्या आणि त्यानंतर मला थांबता आलं. त्यामुळे मला असं वाटतं की, त्याची मला मदत झाली कलाकार म्हणून स्वत:ची स्वत: आर्थिक स्थिरता तुम्हाला आणावी लागते.”