Girija Oak Talk’s About her Husband Suhrud Godbole : गिरिजा ओक मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने मराठीसह हिंदीतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत, तर तिचा नवरा सुहृद गोडबोले निर्माता आहे. अभिनेत्री अनेकदा तिच्या नवऱ्याबरोबरचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
गिरिजा ओक व तिचा नवरा सुहृद गोडबोले यांनी नुकतीच एकत्र मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल तसेच वैवाहिक जीवनाबद्दल सांगितलं आहे. दोघांनी ‘अनुरुप विवाह संस्था’शी संवाद साधताना यामध्ये त्यांनी वैवाहिक जीवनाबद्दल तसेच त्यांच्यात होणाऱ्या किरकोळ भांडणांबद्दल सांगितलं आहे.
‘अशी’ होती गिरिजा ओक व सुहृद गोडबोले यांची पहिली भेट
मुलाखतीमध्ये गिरिजा व सुहृदला त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल विचारण्यात आलेलं. यावर सुहृद म्हणाला, “आमची पहिली भेट माझा मित्र आदित्य सरपोतदारच्या साखरपुड्याला झाली होती. अभिनयक्षेत्राव्यतिरिक्त तेव्हा आमच्या दुसऱ्या मित्रांची एक वेगळी पार्टी होती साखरपुडा झाल्यानंतर. तिथे ही आली होती. तिथे आम्ही एका गाडीने गेलो होतो, ते तिला आठवत नाही पण मला आठवतंय. तेव्हा ती तिच्या तेव्हाच्या बॉयफ्रेंडबरोबर होती. ही आमची पहिली भेट होती. नंतर एका कार्यक्रमादरम्यान कामानिमित्त आमची भेट झाली. मी हिला तेव्हा फोन केला होता. रिअलिटी शो होता, त्यासाठी आम्हाला एक महिला निवेदिका हवी होती आणि वाहिनीकडूनच सांगण्यात आलेलं की, गिरीश ओकांची मुलगी आहे तिला विचारा.”
गिरिजा यावर म्हणाली, “त्याने मला फोन केला आणि फोनवर तो अत्यंत प्रौढ माणसासारखा माझ्याशी बोलत होता की, तारखांचं जरा आपण बघून घेऊयात वगैरे. सुहृद हे नुसतं नाव सांगितल्यामुळे मी त्याला आहो जावो केलं. त्यानंतर लगेच मी शूट करायला गेले तेव्हा तो २५ वर्षांचा होता. मी म्हटलं हा कोण आहे. तो सगळ्यांबरोबर तिथे कामासंबंधित बोलत होता. त्याने मला नंतर त्याची ओळख करून दिली की, मी सुहृद मी फोन केलेला वगैरे. तेव्हा मला असं वाटलं की, हा बोलला होता माझ्याशी फोनवर एवढासा मुलगा. कारण फोनवर आवाजावरून मला कोणीतरी ५० वर्षांची व्यक्ती वगैरे बोलतेय असं वाटलेलं.”
नवऱ्याबरोबरच्या भांडणांबद्दल गिरीजा ओकची प्रतिक्रिया
मुलाखतीमध्ये गिरिजाच्या नवऱ्याने सुहृदने सांगितलं की, गिरिजा फोन केला की त्याला उत्तर देत नाही. फोन उचलत नाही वगैरे. यावर गिरिजा म्हणाली, “भांडण नसलं तर नवरा बायको एकमेकांशी खरं कधी बोलणार. भांडण झालं की सगळं बाहेर येतं, त्यामुळे वाईटही वाटतं; तेव्हा मग मी त्याला रिप्लाय देते. आमची भांडणं किरकोळ असतात. लहान मुलांसारखं आम्ही भांडतो. मोठ्या विषयांवर आम्ही भांडत नाही. त्यावर आम्ही चर्चा करतो.”
सुहृद म्हणाला, “आमच्यात सतत मतभेद असतात, २४ तास मतभेद असतात. आमच्या दोघांचंही म्हणणं असतं, त्यामुळे पदोपदी आम्हाला जाणवत असतं की हे चुकीचं आहे हे बरोबर आहे आणि आम्ही ते एकमेकांना सांगत असतो; त्यामुळे मदभेद हातात, त्याबद्दल काळजी करण्यासारखं काही वाटतं नाही. मी असा आहे की मी लगेच सॉरी म्हणतो, पाच मिनिटात वगैरे मी सॉरी बोलतो आणि माझ्यासाठी ते भांडण तिथेच संपलेलं असतं. पण गिरिजाचं तसं नाहीये, तिला वेळ लागतो.”