Director Amit Chhallare Post : ‘सुखाच्या सरींनी- हे मन बावरे’ ही मालिका ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जायची. २०२० मध्ये या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला. यामधील शशांक केतकर, मृणाल दुसानिस, शर्मिष्ठा राऊत अशा बऱ्याच कलाकारांनी काही वर्षांपूर्वी निर्माते-दिग्दर्शक मंदार देवस्थळींनी मानधन थकवल्याप्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली होती.
मात्र, आज मालिका संपून पाच वर्षे उलटली तरी अद्याप अनेक कलाकारांना व तंत्रज्ञांना त्यांच्या कामाचे पैसे मिळालेले नाहीयेत, असं लोकप्रिय अभिनेते विजय पटवर्धन व ‘हे मन बावरे’ मालिकेसाठी एक वर्ष दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या अमित छल्लारे यांनी म्हटलं आहे.
दिग्दर्शक अमित छल्लारे यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. “पाच वर्षे संयम बाळगला, मंदार सरांचा आदर म्हणून गप्प होतो पण, आता मानसिक त्रास होतोय” असं अमित यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. एकूण सहा लाख सत्तर हजार एकशे एकावन्न रुपयांचं मानधन थकवल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दिग्दर्शक अमिक छल्लारे यांची पोस्ट
माझ्या कामाचे पैसे अजूनही मिळाले नाहीयेत.
नमस्कार.
मी अमित छल्लारे.
मार्च २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत मी मंदार देवस्थळी सर यांच्या टीम वर्क अल्ट्रा क्रिएशन निर्मित ‘हे मन बावरे’ या मालिकेसाठी दिग्दर्शक म्हणून काम केलं. या एक वर्षात, वेळ काळ न बघता, प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जीव तोडून काम केलं. पेमेंट वेळेत न मिळाल्यामुळे मला सिरिअल सोडावी लागली.पण अजूनही माझे ६,७०,१५१/- (सहा लाख सत्तर हजार, एकशे एकावन्न) रुपयांचे पेमेंट अडकले आहे.
या पाच वर्षांत मी संयम ठेवला,
अनेकदा संधी दिली,
प्रत्येक वेळी समजून घेतलं,
नेहमीच सपोर्ट केला,
पण मला फक्त तारखा आणि आश्वासनं मिळत गेली.मंदार देवस्थळी सर हे खूप सिनिअर आहेत. त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आहे आणि राहील. म्हणूनच इतके दिवस गप्प होतो पण आता त्याच गोष्टींचा विचार करून मला खूप मानसिक त्रास होतोय आणि याआधीही झाला आहे. आता काय करायचं तुम्हीच सांगा सर.
आज हे सगळं इथे शेअर करतोय, कारण इतके दिवस मी तुमच्या अडचणी समजून घेतल्या पण आता माझ्याही काही अडचणी आहेत, त्या तुम्ही समजून घ्याव्या. एकदा माझ्या बाजूनेही विचार व्हावा. मला कुणालाही दोष द्यायचा नाहीये. पण इतकी वर्ष वाट पाहूनही न्याय न मिळणं माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे.
आणि या सगळ्यांत माझं काय चुकलं.?
मंदार देवस्थळी सर ज्या अडचणीत आहेत अशी वेळ कुणावरही कधीच येऊ नये.
लवकरच ते यातून बाहेर पडो. माझ्यासारख्या अनेक लोकांचे पैसे अडकले आहेत, ते लवकर मिळो.सर, तुम्ही लवकर या सगळ्यांतून बाहेर पडावं आणि पुन्हा पहिल्यासारखं जोमाने काम करावं हीच सदिच्छा..धन्यवाद
(सर तुमच्याबद्दलचा आदर म्हणून इतके दिवस कधी बोललो नाही पण आज मला व्यक्त व्हावंसं वाटलं. चूकभूल माफ. मला लाईक्स आणि सहानुभूती मिळावी म्हणून मी हे लिहिलं नाहीये. ज्यांना असा अनुभव आला आहे, त्यांना माझं म्हणणं आणि माझी अडचण कळेल)
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, अमित छल्लारेंप्रमाणे अभिनेते विजय पटवर्धन यांनी देखील फेसबुक पोस्ट शेअर करत मंदार देवस्थळी यांच्याकडे पैसे परत करावेत अशी मागणी केली आहे. या दोघांच्या पोस्टवर कमेंट्स करत मराठी कलाविश्वातील कलाकारांसह नेटकऱ्यांनी देखील समर्थन दर्शवलं आहे.