Hina Khan Support’s Mrunal Thakur : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मृणाल ठाकूरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने अभिनेत्री बिपाशाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. यानंतर मृणालने सोशल मीडियावरून याबद्दल तिची प्रतिक्रिया देत खेद व्यक्त केला होता. आता अभिनेत्री हिना खानने यासंदर्भात तिची प्रतिक्रिया दिली आहे.

मृणाल तिची हिंदी मालिका ‘कुमकुम भाग्य’साठी काम करत असताना या मालिकेच्या सेटवर तिने दिलेल्या एका मुलाखतीत बिपाशाबद्दल वक्तव्य केलं होतं. तिने बिपाशाच्या शरीरयष्टीबद्दल वक्तव्य केलेलं या व्हिडीओमधून पाहायला मिळतं, ज्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी मृणालवर टीका केली. सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत याबद्दल तिची प्रतिक्रिया दिली होती. यावेळी तिने बिपाशाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफीदेखील मागितली.

मृणाल ठाकूर व बिपाशा बासूबद्दल हिना खान काय म्हणाली?

हिना खानने आता मृणाल व बिपाशा यांच्या संदर्भात इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. यावेळी तिने मृणाल व बिपाशा या दोघींचं कौतुक केलं आहे. हिना म्हणाली, “शहाणपण हे ज्ञानाच्या झाडाचं फळ आहे, जे अनुभवांमुळे येतं. आपले सामाजिक कौशल्य आणि समजूतदारपणा यांचा विकास आपण जसे मोठे होत जातो तसा होत असतो. आपण सगळेच चुका करतो, विशेषतः जेव्हा आपण तरुण असतो. मी मृणालला समजून घेऊ शकते, मीही अशा चुका केल्या आहेत पूर्वी… काळानुरुप आपण अधिक समंजस होतो. आपण एकमेकांना मदत करत पुढे जातो.”

हिना पुढे मृणाल व बिपाशाबद्दल म्हणाली, “तुमच्याप्रमाणे मीसुद्धा बिपाशा आणि मृणाल यांचा प्रवास पाहिला आहे. दोघीही उत्तम अभिनेत्री आहेत. बिपाशा, तू सगळ्यांसाठी प्रेरणा आहेस. मला खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतोय की, मृणालने भूतकाळात केलेली चूक मान्य केली. मला या दोन्ही स्त्रियांचं कौतुक करायचं होतं. या दोघींनीही भारतीय सिनेमाचा चेहरा बदलला आहे. बिपाशा तुझं व्यक्तिमत्त्व अनेकांना प्रेरणा देतं. तुम्हा दोघींनाही खूप प्रेम. आता आपण हा वाद इथेच मिटवायला हवा.

हिना खान इन्स्टाग्राम स्टोरी

बिपाशाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मृणाल ठाकूरची प्रतिक्रिया

मृणाल म्हणाली, “१९ वर्षांची असताना, त्यावेळी मी विचार न करता काही गोष्टी बोलून गेले. त्यावेळी मला माझ्या शब्दांचं महत्त्व माहीत नव्हतं किंवा विनोदाने म्हटलेली एखादी गोष्ट कोणाला दुखावू शकते, याची मला कल्पना नव्हती. पण, माझे शब्द खरंच एखाद्याला दुखावणारे होते आणि त्याबद्दल मला मनापासून खेद आहे. कोणाच्या शरीरयष्टीबद्दल टीका करण्याचा माझा कधीच हेतू नव्हता. पण, त्या मुलाखतीमध्ये केलेली थट्टा मर्यादेपलीकडे गेली. मला आता समजतंय की, ते शब्द लोकांना कसे वाटले असतील आणि खरंच, मी वेगळे शब्द वापरायला हवे होते. काळाच्या ओघात एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, ती म्हणजे सौंदर्य हे वेगवेगळ्या रूपांत असतं आणि आज मी त्या प्रत्येक रूपाचं कौतुक करते.”

मृणाल ठाकूर इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, हिना खान सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती यामार्फत अनेकदा वेगवेळ्या गोष्टींबद्दल तिच्या प्रतिक्रिया देत असते. सध्या ती ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमात झळकत आहे. यामध्ये तिने तिच्या नवऱ्यासह सहभाग घेतला आहे.