Hina Khan’s Mother In law complaints About Her : हिना खान हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमात झळकत आहे. यामध्ये तिच्यासह तिचा नवराही सहभागी झाला आहे.अशातच आता या कार्यक्रमाचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

‘कलर्स’ वाहिनीवरील ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमात हिना खान व तिच्या नवऱ्यासह हिंदी टेलिव्हिजनवरील इतरही अनेक सेलिब्रिटी कपल सहभागी झाले आहेत. अशातच आता वाहिनीने या कार्यक्रमाचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये हिना खानच्या सासुबाई आल्याचं पाहायला मिळत आहे.

हिना खानच्या सासुबाईंनी केली तक्रार

सोनाली बेंद्रे व मुनव्वर फारुकी सूत्रसंचालन करत असलेल्या ‘पती पत्नी और पंगा’ कार्यक्रमातील नवीन भागात सर्व सुनांच्या सासुबाई उपस्थित असणार आहेत. यानिमित्तानेच हिना खानच्या सासुबाई म्हणजेच रॉकी जैस्वालच्या आई लता जैस्वाल यांनीही हजेरी लावली आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये त्या हिनाबद्दल बोलत असल्याचं पाहायला मिळतं. ‘कलर्स’ वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये त्या “मी पूर्ण दिवस घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवत असते, ती टेबलवर बसलेली असते; तिला कुठल्या मसाल्यांबद्दल काहीही माहिती नसते. स्वयंपाकघराशी तिचा संबंध नसतो. पण, तरी पदार्थ चाखल्यानंतर तिला लगेच कळतं की यामध्ये काय कमी आहे काय जास्त आहे,” असं म्हणताना दिसतात.

तिचे खूप नखरे असतात – हिनाच्या सासुबाई

हिनाच्या सासूबाई तिच्याबद्दल बोलत असताना त्यावेळी मुनव्वर बोलतो, “येत काही नाही पण नखरे खूप आहेत; याला दुजोरा देत तिच्या सासुबाईसुद्धा “खूप नखरे आहेत” असं म्हणतात. त्यावेळी या कार्यक्रमातील अजून एक स्पर्धक म्हणजेच अभिनेत्री अविका गौर लता जैस्वाल यांना म्हणते, “तुम्ही सासू आहात सासू” यावर त्या बोलतात, “सासू तर आहे पण घरी तिच्याबरोबर पंगा कोण घेइल.” हे सगळं ऐकून हिनाला धक्का बसतो व तिच्यासह तिथे उपस्थित असलेले सर्व जण हसू लागतात. हिनाच्या सासुबाईंनी गंमत करत त्यांच्या सुनेबद्दल गोड तक्रार केलेली समोर आलेल्या प्रोमोमधून पाहायला मिळते.

वाहिनीने शेअर केलेल्या या प्रोमोखाली हिनाने कमेंट करत लिहिलं की, “माझी सासू खूप साधी आहे, शेवटी सासू कोणाची आहे”; तिच्यासह अनेक नेटकऱ्यांनीसुद्धा तिच्या सासुबाईंचं कमेंट करत कौतुक केलं आहे.

दरम्यान, ‘पती पत्नी और पंगा’ हा कार्यक्रम शनिवार व रविवार रात्री ९:३० वाजता प्रसारित होतो. आता लवकरच या कार्यक्रमातील हा विशेष भाग येत्या शनिवारी म्हणजेच उद्या ३० ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हिंदी टेलिव्हिजनवरील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी कपलनी यामध्ये सहभाग घेतला असून यातील अनेक अभिनेत्रींच्या सासुबाईंनी हजेरी लावल्याचं वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमधून पाहायला मिळतं. त्यामुळे या भागात अभिनेत्रींच्या सासुबाई त्यांच्याबद्दल काय बोलतात हे पाहणं रंजक ठरेल.