Hina Khan Reveals love Story With Husband Rocky Jaiswal : अभिनेत्री हिना खान एक वर्षाहून अधिक काळापासून कर्करोगाशी झुंजत आहे. यादरम्यान तिच्यावर उपचार सुरू असताना ती काही महिन्यातच कामावर रुजू झाली होती. त्यानंतर हिनाने तिचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालसह लग्न केलं. आता अभिनेत्रीने तिच्या नवऱ्याबद्दल सांगितलं आहे.
हिना व रॉकी ‘कलर्स’ वाहिनीवरील आगामी कार्यक्रम ‘पती पत्नी और पंगा’मध्ये झळकणार आहेत. यादरम्यान कार्यक्रमाच्या प्रीमियरला हिनाने तिच्या कठीण काळात नवऱ्याने तिला कशी साथ दिली याबाबत सांगितलं आहे. यावेळी तिने त्यांची प्रेमकहाणीसुद्धा सांगितली आहे. हिना म्हणाली, “मी रॉकीला दहा वर्षांपूर्वी भेटले होते. मला अजिबात वाटलं नव्हतं की आमच्या आयुष्यामध्ये असं काही पुढे घडणार आहे.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “आम्ही माझ्या पहिल्या मालिकेच्या सेटवर भेटलो. खरं सांगायचं तर तेव्हा मला रॉकी अजिबात आवडायचा नाही. पण, वेळेनुसार गोष्टी बदलतात. हळू हळू आम्ही बोलायला सुरू केलं. आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत हे कळण्यापूर्वी आमच्यामध्ये मैत्री होती, आम्ही एकमेकांशी खूप बोलायचो, हसायचो; मग एक दिवस आम्हाला जाणवलं की हे काहीतरी वेगळं आहे. आम्ही याबाबत व्यक्तही झालो नाही, ना ही आम्ही प्रपोज वगैरे केलं. आम्हाला फक्त आमच्या एकमेकांसाठीच्या भावना कळत होत्या आणि त्या फार महत्त्वाच्या होत्या.”
कर्करोगाशी झुंज देताना या कठीण काळात रॉकीने कशी मदत केली याबाबत हिनाने सांगितलं आहे. ती म्हणाली, “जे झालं ते सोपं अजिबात नव्हतं. आम्ही त्याची कल्पनाही केली नव्हती. आयुष्याने आमची खूप कठीण परीक्षा घेतली. त्याने त्याचं काम, त्याचं आरोग्य अशा सर्व गोष्टी सोडून फक्त मला कसं बरं वाटेल याची काळजी घेतली. एवढं प्रत्येकजण करत नाही, काही लोक अशावेळी तुमची साथ सोडून जातात.”
अभिनेत्रीचा नवरा रॉकी जैस्वाल याबाबत म्हणाला, “जर तिचा त्रास मला कमी करता आला असता तर मी ते एका क्षणात केलं असतं, पण ते शक्य नाहीये. त्यामुळे मी तिच्यासाठी एकच गोष्ट करू शकत होतो. तिच्याबरोबर राहून तिला या काळात साथ देणं एवढंच माझ्या हातात होतं. माझ्यासाठी ते करणं काही मोठी गोष्ट नव्हती. माझं तिच्यावर प्रेम आहे, त्यामुळे तिच्यासाठी गरजेच्यावेळी उभं राहणं महत्त्वाचं होतं.”
रॉकी पुढे म्हणाला, “तुम्ही कितीही त्या व्यक्तीच्या जवळ असलात, तरी मी तिचा नवरा असूनही हे सांगतो तिने जे सहन केलं, ती ज्यामधून गेली, ते फक्त तिलाच माहीत. आपल्याला तो त्रास कधीच कळणार नाही. प्रत्येक दिवशी रोज नवीन अव्हान असतं आणि प्रत्येक दिवस तिला त्याला सामोरं जावं लागतं. पण, तरी कधीच तिने हार मानली नाही.”
हिना खान व रॉकी जैस्वाल ‘पती पत्नी और पंगा’ या आगामी कार्यक्रमात झळकणार आहेत. यामध्ये त्यांच्यासह गुरमित चौधरी-देबिना बॅनर्जी, रुबिना दिलैक-अभिषेक शुक्ला आणि इतर काही कलाकार जोडी झळकणार आहेत. सोनाली बेंद्रे व मुनव्वर फारुकी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. २ ऑगस्टपासून रात्री ९:३० वाजता हा कार्यक्रम शनिवार व रविवारी प्रसारित होणार आहे.