‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या स्टार प्लसवर प्रदर्शित होणाऱ्या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हीना खान. नेहमी आपल्या सोशल मीडियावर केलेल्या म्युझिक व्हिडीओ, पोस्ट व परखड वक्तव्यामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री आता तिच्या आजारपणामुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत तिने आपल्याला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाल्याचे सांगितले होते.

आता तिने पहिल्या केमोथेरेपीदरम्यानचा व्हिडीओ शेअर करीत भावनिक पोस्ट लिहिली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला हीना रेड कार्पेटवर पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना दिसत असून, नंतर ती पुरस्कार घेताना दिसत आहे आणि त्यानंतर ती आपल्या उपचारासाठी दवाखान्यात जाताना दिसत आहे. हीना भावूक झाल्याचे दिसत असून, “सगळी प्रसिद्धी गेली आणि आता मी माझ्या पहिल्या केमोथेरपीसाठी तयार आहे”, असे शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हीनाने म्हटले आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना हीनाने लिहिले आहे, “त्या पुरस्कार सोहळ्याच्या रात्री मला माहीत होते की, मला कर्करोग झाला असल्याचे निदान झालं आहे. पण फक्त माझ्यासाठी नाही, तर आपल्या सगळ्यांसाठी माझ्या सदसद्विवेक बुद्धीनं विचार करून, मी त्याचा पुरस्कार सोहळ्यावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. त्या दिवसानं सगळंच बदलून टाकलं. माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळाला त्या दिवशी सुरुवात झाली.” पुढे ती म्हणते, “आपण ज्यावर विश्वास ठेवतो, तसेच आपण बनतो. त्यामुळे स्वत:चा पुन्हा शोध घेण्यासाठी मी या आव्हानाकडे संधी म्हणून बघायचं ठरवलं. मी सकारात्मकतेनं पुढे जायचा विचार केला. हा अनुभव माझ्यासाठी इतर अनुभवांसारखा सामान्य राहिला पाहिजे हे मनाशी ठरवलं होतं. माझं काम, कामासाठी इतरांना दिलेली आश्वासनं, कामाप्रति असलेली आवड आणि कला या बाबी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मी हार मानण्यास नकार दिला. हा पुरस्कार मला माझ्या पहिल्या केमोथेरेपीच्या आधी मिळाला होता. त्यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ प्रेरणादायीच नव्हता; तर, आपण आयुष्यात एक ध्येय घेऊन जगत आहोत याची त्यामुळे मला खात्री पटली. मी माझ्या मनाची तयारी केली. माझी इच्छाशक्ती कर्करोगावर भारी पडेल, असे स्वत:ला सांगितले.

पुढे ती म्हणते, “मी कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यानंतर थेट माझ्या पहिल्या केमोथेरपीसाठी दवाखाना गाठला. मी प्रत्येकाला विनम्रपणे विनंती करते की, पहिल्यांदा तुमच्या आयुष्यातील संकटांना, आव्हानांना सामान्य करा; मग स्वतःसाठी ध्येय निश्चित करा आणि त्या मार्गानं जगण्याचा प्रयत्न करा. परिस्थिती कितीही कठीण असो. कधीही मागे फिरू नका. हार मानू नका”, असे म्हणत तिने आपल्या चाहत्यांना कधीही हार न मानण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा : दोन मराठी अभिनेत्री हिंदी मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत, गायत्री सोहम म्हणाली, “आम्ही नाशिकच्या आहोत अन्…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हीनाने शेअर केलेल्या व्हिडीओनंतर चाहत्यांसह अनेक कलाकरांनी हीनाच्या धाडसाचे आणि समोर येणाऱ्या गोष्टींकडे सकारात्मतेने पाहण्याच्या तिच्या दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे. दिलजित कौरने “तू लवकच बरी होशील आणि असे अनेक पुरस्कार घेशील”, असे म्हटले आहे. तर एकता कपूरने, “तू सर्वांत जास्त चमकणारा तारा आहेस”, असे म्हणत हीनाला धीर दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हीनाने तिसऱ्या स्तराचा स्तनाचा कर्करोग झाल्याचे सांगताना आपण उपचार घेत असून, लवकरच बरे होऊ, असे म्हटले होते.