Aadesh Bandekar Education : झी मराठीवरील ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आलेले लाडके भावोजी म्हणजे आदेश बांदेकर. ‘दार उघड बये… दार उघड’ असं म्हणत आदेश बांदेकरांनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.
अभिनेते, निवेदक असा प्रवास करणारे आदेश बांदेकर आता निर्मातेही झाले आहेत. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर’ मग मालिकेची ते निर्मिती करत आहेत. सध्या मनोरंजन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आदेश बांदेकरांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नैराश्याचा सामना करावा लागला होता.
आदेश बांदेकर यांच्या आयुष्यात आलेल्या या नैराश्याचं कारण होतं दहावीत मिळालेले कमी गुण. दहावीत अपेक्षित गुण न मिळाल्याने आदेश बांदेकर नैराश्यात गेले होते. यामुळे त्यांनी स्वतःचं जीवन संपवण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र यावर त्यांनी यशस्वी मात केली. त्यांच्या वडिलांच्या सहकार्यामुळे ते यातून बाहेर येऊ शकले.
एकेकाळी दहावीत ३७ टक्के मिळालेल्या आदेश बांदेकरांनी नंतर मात्र त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि ते अजूनही शिक्षण घेत आहेत. याबद्दल त्यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. यावेळी ते म्हणाले, “मला दहावीत ३७ टक्के मिळाले होते, याबद्दल आता सांगण्यात काही वाटत नाही. पण तेव्हा मी बाकी सगळ्या गोष्टीत उत्तम होतो.”
यापुढे आदेश बांदेकर म्हणाले, “मी कॉमर्समध्ये पदवीचं शिक्षण घेतलं. मग लॉकडाऊनमध्ये मी पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केलं. नुकतीच मी L.L.B. ची पहिल्या सत्राची परीक्षासुद्धा दिली. माझ्याबरोबर इतर सगळे विद्यार्थी बसले होते. त्यांच्याबरोबर मीसुद्धा पेपर दिला. माटुंग्याच्या कॉलेजमध्ये परीक्षा दिली.”
यानंतर ते सांगतात, “मी L.L.B.ची परीक्षा दिली आहे, त्या विषतात मला प्रॅक्टिस करायची नाही. पण मी १९९१ मध्ये शिक्षण सोडलं होतं; तेव्हाची परीक्षा द्यायची बाकी होती, ती आता दिली आणि मी आता Ph.D. चे शिक्षणही घेत आहे.” दरम्यान, आदेश बांदेकरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी नुकताच वारीनिमित्त ‘माऊली महाराष्ट्राची’ हा कार्यक्रम केला