अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षय देवधर २ डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकले. पण त्यांच्या लग्नाची चर्चा मात्र अद्याप सुरुच आहे. या दोघांचा शाही विवाहसोहळा पुणे येथे पार पडला होता. त्यानंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. ऑनस्क्रीन राणादा पाठकबाई ते खऱ्या आयुष्यातले नवरा-बायको असं त्यांचं लग्न बरंच गाजलं. नुकतंच त्या दोघांनी ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्याने अक्षयामुळे माझ्यात आणि आईमध्ये एकदा भांडण झालं होतं, याबद्दलचा गौप्यस्फोटही केला.

होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात अभिनेते आदेश बांदेकर यांनी हार्दिक अक्षयाला विविध प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी मालिका, त्यांचे खासगी आयुष्य, बालपण याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. यावेळी हार्दिकने अक्षया देवधरला आईने घातलेल्या मागणीबद्दल सांगितले. यावेळी हार्दिक म्हणाला, “तुझ्यात जीव रंगला ही मालिका सुरु असताना माझ्या आईने २०१७ मध्ये तिला लग्नासाठी विचारलं होतं. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका सुरु झाल्यानंतर वर्षभराने आईने तिला मागणी घातली होती. त्यावेळी माझ्या आईने तिला तू मला आवडतेस, तू याच्याशी लग्न कर”, असं म्हटलं होतं.
आणखी वाचा : “मला आर्मीत करिअर करायचं होतं पण…” राणादाने सांगितलं सिनेसृष्टीत पदार्पण करण्यामागचं खरं कारण

याबद्दल अक्षया म्हणाली, “हार्दिक एकदा एका शूटमध्ये व्यस्त होता. त्यावेळी त्याच्या आईचा फोन आला. आमचं सेटवर छान कुटुंब झाल्याने मी त्यांचा तो फोन उचलला. त्यावेळी त्यांनी माझ्याशी छान गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांनी मला लग्नाबद्दल विचारलं. तेव्हा माझ्या मनात कुठेही काहीही नव्हते.”

“माझ्या आईने तिला लग्नासाठी विचारलं हे मला समजल्यानंतर आमच्यात भांडण झालं होतं. त्यावेळी मी आईला, अक्षयाने माझी तक्रार केली तर काय होईल, हे तुला माहितीये का? सेटवर काय होईल? असं आईला म्हटलं होतं. त्यानंतर मी आईला फार समजवलं होतं. अगं आई असं काही नसतं. जर काही झालं तर आमची मैत्रीही तुटेल आणि सेटवर आमचं बोलणंही बंद होईल. त्यानंतर साधारण दोन-तीन महिने हा विषय बंद झाला होता”, असे हार्दिकने म्हटले.

आणखी वाचा : “आईचा हट्ट, लग्नाची मागणी ते साखरपुडा…” ‘अशी’ सुरु झाली राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला ती आवडत होती. माझ्या आईने एकदा असंच मला म्हटलेलं की हार्दिकसाठी हीच मुलगी छान आहे. हिच्याशी त्याने जर लग्न केलं तर चांगलंच होईल. मी तिला फोन करुन सेटवर अगदी सहजच विचारलं होतं. तेव्हापासूनच सेट ते सेटींग सुरु झालं”, असे हार्दिकच्या आईने यावेळी सांगितले.