Actor Devdatta Nage New Home : स्वत:चं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेक जण त्यांच्या आवडत्या, सोईच्या ठिकाणी घर खरेदी करतात. अलीकडे अनेक कलाकार मंडळीही घर खरेदी करताना दिसत आहेत. अशातच आता मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते देवदत्त नागे यांचंसुद्धा लवकरच स्वत:चं घर होणार आहे. याबाबत त्यांनी स्वत: ही माहिती दिली आहे.
‘जय मल्हार’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले देवदत्त नागे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. या मालिकेतून त्यांनी अनेकांच्या मनात जणू कायमच घर केलं आहे. नुकतेच ते ‘उदे गं अंबे’ या मालिकेतून झळकले होते. अशातच अभिनेत्याने आता त्यांच्या घराची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. देवदत्त नागे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत लिहिलं, “येळकोट येळकोट… जय मल्हार श्री खंडेरायांच्या कृपेनं साक्षात श्री खंडेरायांच्या सान्निध्यात माझं स्वत:चं घर जेजुरीमध्ये… श्री खंडेरायांच्या चरणी माझी सेवा रुजू झाली हे माझे परम भाग्य.”
अभिनेते पुढे म्हणाले, “माझी बहीण सौ. अमृताताई आणि माझे भावोजी श्री. संदीपजी घोणे यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन आणि जिथे घर उभे राहणार आहे तिथे श्री खंडेरायांचे जागरण, गोंधळ म्हणजे केवळ आनंद सदानंद बा… श्री खंडोबा आता मनामध्ये येईल तेव्हा तुझ्या सान्निध्यात राहायला मिळणार मला, तुझी सेवा माझ्याकडून निरंतर घडणार, माझ्याकडून तुझी सेवा अशीच घडू दे रे बा… सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार”
देवदत्त नागे यांनी या पोस्टमधून ते जेजुरीमध्ये स्वत:चे घर बांधणार असून, नुकतेच भूमिपूजन झाल्याची माहिती दिली. यावेळी त्यांची बहीण व भावोजी यांच्या हस्ते पूजन झाले असून, आता लवकरच त्यांचे जेजुरीमध्ये स्वत:चे घर होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देवदत्त यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरून शेअर केल्यानंतर अनेकांनी त्या पोस्टखाली त्यांना शुभेच्छा दिल्याच्या पाहायला मिळत आहे.
दरम्यान, देवदत्त नागे यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर नुकतेच ते ‘स्टार प्रवाह’वरील ‘उदे गं अंबे’ मालिकेत झळकले होते. त्यांनी आजवर मराठी मालिका, चित्रपटांत काम केले आहे. देवदत्त यांनी हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांतही काम करीत तेथील प्रेक्षकांची मनेही जिंकली आहेत.