अभिनेता जय दुधाणे हा विशेष चर्चेत आला ते ‘बिग बॉस मराठी’मुळे. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात जय दुधाणे दुसऱ्या क्रमांकाचा दावेदार ठरला होता. ‘बिग बॉस’च्या घरात असताना टास्कसाठी विविध स्ट्रेटेजी आखत त्याने उत्तम खेळाने अनेकांची मनं जिंकली. तर ‘बिग बॉस’मुळेच तो खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचला. यानंतर तो ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत झळकला होता. मात्र, जयनं काही वैव्यक्तिक कारणांमुळे पुढे या मालिकेतून एक्झिट घेतली. त्यानंतर जय ‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात महत्त्वाच्या भूमिकेत झळकला.

अशातच आज अभिनेत्याचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अनेक कलाकारांनी त्याला सोशल मीडियामार्फत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्याची प्रेयसी हर्षला पाटीलनेही त्याला हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हर्षलाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हर्षलाने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी एकमेकांबरोबर घालवलेले काही क्षण पाहायला मिळत आहेत. व्हिडीओमध्ये जय हर्षलाची मस्करी करतानाही दिसतोय आणि ‘या व्हिडीओला तिने वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! तुझ्याकडून मिळणाऱ्या प्रेमासाठी कृतज्ञ’, अशी हटके कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओखाली त्यांच्या अनेक चाहत्यांनी जयला शुभेच्छा देत दोघांचं कौतुक केलं आहे.

काही दिवसांपासून दोघे एकमेकांना डेट करीत होते. नुकतंच जयनं हर्षलाला प्रपोज केलं आणि त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. जयनं मार्च महिन्यात हर्षलाला ते दोघे फिरायला गेले असताना त्याच्या हटके स्टाईलमध्ये प्रपोज केलं होतं. यावेळी हर्षलानंही होकार दिला होता. त्यानंतर सोशल मीडियावर या जोडीची बरीच चर्चा रंगली होती. समीक्षा टक्के, अनुभव दुबे, दिव्या अग्रवाल, अक्षय वाघमारे या कलाकारांनी सोशल मीडियावर या जोडीचे फोटो शेअर करीत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

दरम्यान, जय दुधाणे शेवटचा ‘धर्मवीर २’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकला होता. त्यापूर्वी तो ‘स्टार प्रवाह’वरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत तो महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाला. त्यासह तो २०२३ साली आलेल्या गडद अंधार या चित्रपटात अभिनेत्री नेहा महाजनसह महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता.