Ketaki Kulkarni shares experience first day of shooting: ‘कमळी’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतील कमळी, ऋषी, अनिका, आबा आणि इतर सर्वच पात्रे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत

मालिकेत कमळीची भूमिका अभिनेत्री विजया बाबरने साकारली आहे, तर ऋषीच्या भूमिकेत निखिल दामले दिसत आहे. याबरोबरच अनिकाची भूमिका ही अभिनेत्री केतकी कुलकर्णीने साकारली आहे.

अनिका ही श्रीमंत घरची, गर्विष्ठ आणि ऋषीचे लक्ष तिच्याकडे जावे यासाठी धडपड करणारी अशी आहे. कमळी आणि अनिका यांच्यामध्ये भांडण झाल्याचेदेखील पाहायला मिळाले. आता अभिनेत्री केतकी कुलकर्णीने कमळी मालिकेत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

केतकी कुलकर्णी काय म्हणाली?

मराठी सीरिअल्स ऑफिशिअल्सशी संवाद साधताना केतकी कुलकर्णी म्हणाली, “माझ्या आठवणीत ‘कमळी‘च्या पहिल्या दिवसाच्या शूटिंगचा अनुभव अजूनही अगदी ताजा आहे. तो आमचा प्रोमोशूटचा दिवस होता. मी सिम्बायोसिस कॉलेजमध्ये शूटसाठी गेले. या कॉलेजमध्ये माझे अनेक मित्र शिक्षण घेत आहेत, त्यामुळे तिथे शूट करणं हेच खूप खास होतं.

“त्या दिवशी एक डान्स आणि रॅप सीन होता. मी रिहर्सल करून लगेच शूटसाठी तयार झाले. शूटच्या वेळी दोन नवीन ओळी वाढल्या. त्या मी पटकन पाठ केल्या. तो अनुभव खूप मजेशीर होता, कारण मी पहिल्यांदाच अशा मोठ्या सेटवर रॅप सीन करत होते, त्यामुळे पहिलाच दिवस मला खूप काही शिकवून गेला आणि कायम लक्षात राहील असा होता.”

“अनिकाच्या भूमिकेसाठी माझी निवड झाल्याचे जेव्हा मला कळले, तेव्हा मला खूप आनंद झाला. सर्वात आधी मी आई-बाबांना सांगितलं. या क्षेत्रापासून मी काही काळासाठी दूर गेले होते. पाच वर्षांनंतर मला पुन्हा ही संधी मिळाली, त्यामुळे असं वाटत होतं की जणू मी पुन्हा माझ्या घरात परत आले आहे. अभिनयाच्या या प्रवासात इतक्या वर्षांनी मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करणं, हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण होता.”

“पहिला प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून छान प्रतिसाद मिळाला. खास करून माझ्या रॅपवर, अभिनयावर आणि एकूण प्रोमोच्या लूकवर खूप प्रेम मिळालं. माझ्या घरच्यांनाही खूप आनंद झाला. अनेक नातेवाईकांनी फोन करून कौतुक केलं, काहींनी तर व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आणि इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रोमो शेअर केला. तेव्हा असं वाटलं की आपल्यातल्या मेहनतीला खरी दाद मिळतेय”, असे म्हणत अभिनेत्रीने तिचा आनंद व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कमळी तिचे मुंबईला जाण्याचे स्वप्न कसे पूर्ण करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.