Kamli Fame Ketaki Kulkarni Talks About Her Role : केतकी कुलकर्णी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती ‘झी मराठी’वरील ‘कमळी’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे, त्यामुळे ती खऱ्या आयुष्यातही तशीच आहे असं अनेकांना वाटतं आणि म्हणून सोशल मीडियामार्फत काही जण तिच्यावर टीका करतात असं तिने म्हटलं आहे.
केतकी कुलकर्णी खूप लहान असल्यापासून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. विविध मालिकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती कमळी मालिकेत अनिका हे खलनायिकेचं पात्र साकारत असून यामध्ये ती कमळीला अनेकदा त्रास देण्यासाठी वेगवेगळे प्लॅन करताना दिसते; तर मालिकेत ती शिष्ट, रागराग करणारी असल्याचं दिसतं. त्यामुळे खऱ्या आयुष्यातही ती तशी आहे असं अनेकांना वाटतं, पण तसं नसल्याचं तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
केतकीने ‘राजश्री मराठी’ला तिच्या आई-वडिलांसह मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने तिच्या कामाबद्दल, स्वभावाबद्दल सांगितलं आहे. यावेळी ती स्वत:बद्दल बोलत असताना म्हणाली, “मी खूप ड्रामा करते. मी रडत असते, हसत असते; जे काही असते ते मोठ्या प्रमाणात व्यक्त करते.” यावेळी तिच्या आई-वडिलांनाही तिच्या स्वभावाबद्दल विचारलं तेव्हा तिच्या वडिलांनी तिला ती गोड आहे असं म्हटलं. यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे.
केतकी कुलकर्णीची प्रतिक्रिया
केतकी म्हणाली, “बाबांना वाटलं मी गोड आहे, म्हणजे मी खरंच गोड आहे. नाहीतर मला माझ्या भूमिकेमुळे तुम्ही मी शिष्ट आहे वगैरे बोलत असता, पण मी तशी नाहीये. मी खूप वेगळी आहे. मला कधी प्रत्यक्षात भेटा, मी अजिबात शिष्ट नाहीये. मी माझ्या भूमिकेच्या एकदम विरुद्ध आहे. फक्त फॅशनच्या बाबतीत मी माझ्या भूमिकेसारखी आहे.”
केतकी पुढे म्हणाली, “मी थोडी धडपडी आहे, पण मी गोड आहे. तुम्ही माझ्या भूमिकेवरून मला बोलू नका; अनिका ही भूमिका मी साकारते, अभिनय करते. खऱ्या आयुष्यात मी तशी नाहीये, नाहीतर लोक कमेंट्समध्येही लिहिलात, तू खऱ्या आयुष्यातही शिष्ट आहे. एकदा भेटा न मला, मग कळेल; कारण मला वाईट वाटतं, तुम्ही मला शिष्ट बोलता.”
