Zee Marathi Kamali Serial : ‘कमळी’ मालिकेत सध्या कामिनीने अन्नपूर्णा आजीसमोर प्रॉपर्टी संदर्भात मोठी अट ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. जर सहा महिन्यात महाजनांची मोठी नात घरात नाही आली तर, सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर होणार आहे. खरंतर अन्नपूर्णा आजीने प्रॉपर्टीचा ५०-५० टक्के हिस्सा करून तो दोन्ही नातींच्या नावावर करायचा असा निर्णय घेतलेला असतो. पण, हा निर्णय कामिनीला मान्य नसतो.
जी नात १७ वर्षे उलटली तरी समोर आली नाहीये, ती आता काय येणार? त्यामुळे या प्रॉपर्टीवर पूर्ण हक्क अनिकाचा आहे असं कामिनी सगळ्या कुटुंबीयांसमोर सांगते. अर्थात, सुरुवातीला अन्नपूर्णा तिचं काहीच ऐकत नाही पण, त्यानंतर राजनने मध्यस्थी केल्यावर अन्नपूर्णासमोर कामिनीची अट मान्य करण्याशिवाय पर्याय नसतो. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असं म्हणत अन्नपूर्णा प्रॉपर्टीच्या कागदांवर सह्या करते.
दुसरीकडे, कमळी कॉलेजच्या फी संदर्भात चर्चा करण्यासाठी महाजनांच्या घरी येते. पण, अनिका वेगळाच डाव साधते आणि कमळीला घरापासून दूर नेते. तसेच तुला आजीला भेटायचं असेल तर, “माझी गाडी पुसून काढ, स्वच्छ कर” असंही सांगते. कमळी हतबल असते, त्यामुळे परिस्थितीनुसार ती मोठ्या मनाने अनिकाची गाडी पुसते. खिडकीतून सदानंद महाजन या सगळ्या गोष्टी पाहत असतात. पण, आजारपणामुळे त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नसतात, त्यांची वाचाही गेलेली असते. ‘कमळी’च्या हातावरची जन्मखूण ते अगदी लगेच ओळखतात आणि अन्नपूर्णाला बाहेर पाहण्यासाठी इशारा करतात. आपली मोठी नात हीच आहे… ती परत आलीये असा इशारा त्यांना द्यायचा असतो पण, परिस्थितीमुळे आणि कामिनीच्या दबावामुळे ते स्वत:च्या भावना व्यक्त करू शकत नाहीत.
आता अन्नपूर्णा आपली मोठी नात लवकरात लवकर घरी परत यावी यासाठी एक पूजा करणार आहे. या पूजेचं आमंत्रण आजी तिच्या लाडक्या कमळीला सुद्धा देते. कारण, कमळीच आपली मोठी नात आहे हे सत्य या दोघींनाही माहिती नसतं. पूजेला येण्यासाठी अन्नपूर्णा आजी कमळी आणि तिची मैत्रीण निंगी या दोघींना भेटवस्तू देते.
कमळीचा नवीन लूक
अन्नपूर्णा आजीने दिलेल्या पिशवीत सुंदर साडी आणि पारंपरिक बांगड्या, नथ असते. आता पहिल्यांदाच मालिकेत कमळीचा एकदम सुंदर लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रोज दोन वेण्या, परकर पोलक घालून फिरणारी कमळी पहिल्यांदाच साडी नेसून नटूनथटून महाजनांच्या घरी पूजेला जाणार आहे. मोकळे केस, नाकात नथ, हातात बांगड्या, सुंदर साडी या लूकमध्ये कमळी अतिशय सुंदर दिसत आहे. या नव्या लूकमुळे कमळीला सर्वांसमोर कमी लेखण्याचा अनिकाचा प्लॅन फ्लॉप होणार हे पाहून प्रेक्षकही खूश झाले आहेत. “आता इथून पुढे कमळीचा लूक असाच ठेवा” असंही काही जणांनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे.
याउलट अनिका सुद्धा स्टायलिश साडी नेसून हृषीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करेल. आता महाजनांच्या घरच्या पुजेला नेमकं काय-काय घडणार याचा उलगडा ‘कमळी’ मालिकेच्या २१ ऑगस्टच्या एपिसोडमध्ये होणार आहे. ही मालिका रात्री ९ वाजता प्रसारित केली जाते.