Kamali Marathi : ‘कमळी’ मुंबईत आल्यापासून तिची सगळ्यात मोठी शत्रू झालीये अनिका. कमळीचा स्वभाव अगदीच साधाभोळा असतो. प्रत्येकाला समजून घेऊन आपलं आयुष्य आनंदी कसं जगता येईल याकडे कमळीचं लक्ष असतं. पण, अनिका मात्र एकदम विरुद्ध स्वभावाची असते.

कमळीला कॉलेजमध्ये प्रवेश मिळू नये यासाठी अनिकाने अनेक प्रयत्न केलेले असतात. पण, ते सगळे निष्फळ ठरतात. कारण, कमळीला स्वत: अन्नपूर्णा महाजन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतात. याशिवाय हृषी देखील तिला कायम मदत करत असतो.

मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात हृषी आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर पार्टीसाठी बाहेर जाणार असल्याचं पाहायला मिळतं. यावेळी त्याची आई चांगल्या हॉटेलमध्ये जा असा सल्ला त्याला देते. इतक्यात हृषीला कमळी दिसते, त्यामुळे अनिकाची ग्रँड पार्टी सोडून हृषी आणि कमळी दोघेही रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात वडापाव खातात.

हृषीने पार्टीने येण्यास नकार दिला यामुळे अनिका प्रचंड संतापते. तिला काहीही सुचत नसतं…ती सगळं सोडून हॉटेलच्या बाहेर निघून येते. इतक्यात तिला कमळी आणि हृषी वडापाव खात असल्याचं पाहायला मिळतं. आता कमळीला चांगलीच अद्दल घडवायची असा निर्णय अनिका घेते.

अनिकाबरोबर झालेल्या वादाचा परिणाम कमळीच्या शिक्षणावर होणार आहे. कमळी हुशार असल्याने ती परीक्षेत नक्की पास होणार याची खात्री हृषीला असते. पण, ऐनवेळी कारस्थान करून अनिका कमळीचा पेपर बदलते; ज्यामुळे कमळी नापास होते. आता नापास झाल्यामुळे कॉलेज सोडून जायची वेळ तिच्यावर येते. ती प्रचंड दुखावते. या कठीण प्रसंगात हृषी पुन्हा एकदा कमळीच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार आहे.

हृषीला कमळीच्या बाबतीत हे सगळं कोणी केलंय याची पुरेपूर खात्री असते. त्यामुळे कमळीचा हात धरून तो स्वत: तिला मुख्याध्यापकांच्या केबिनकडे घेऊन जातो. अनिकाला हृषी कमळीची एवढी मदत करतोय हे पाहून धक्का बसतो.

हृषी कमळीला शेवटची संधी देण्याची विनंती मुख्याध्यापक सरांकडे करतो. कारण, तिच्या पेपरची अदलाबदल झाल्याचं सर्वांसमोर सिद्ध झालेलं असतं. यावेळी सर, एक अट घालणार आहेत. कमळीला पुन्हा पेपर देण्याची संधी नक्की मिळेल पण, तिला फसक्लास मिळवावा लागेल तरच, पुढे या कॉलेजमध्ये शिक्षण घेता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमळी जराही विचार न करता सरांना चांगले गुण मिळवेन असा शब्द देते. आता कमळी परीक्षेत कशी पास होणार, अनिका पुन्हा काही कारस्थान करणार की नाही याचा उलगडा मालिकेच्या आगामी भागात होणार आहे. दरम्यान, ही मालिका रोज रात्री ९ वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाते.