kamali upcoming twist: ‘कमळी’ ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेतील कमळी ही खेडेगावातील आहे. मात्र, मुंबईसारख्या शहरात जाऊन शिक्षण घेण्याचे ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्न करताना दिसते.

आईचा विरोध पत्करून ती, तिची बालमैत्रीण निंगीसह मुंबईत येते. मुंबईत आल्यानंतर अनिका तिची आई व आजी तिला त्रास देतात. तिला कॉलेजमध्ये प्रवेश मिळू नये यासाठी अनेक प्रयत्न करतात. पण, शेवटी कमळी व तिच्या मैत्रिणीला कॉलेजमध्ये प्रवेश मिळताना दिसतो.

अन्नपूर्णाआजी, हृषी तिला वेळोवेळी मदत करताना दिसतात. तर, कमळी व हृषीमध्ये जवळीकता वाढल्यामुळे अनिकाला ईर्षा निर्माण होते. कॉलेजमध्येदेखील कमळीला चांगले मार्क्स मिळू नयेत म्हणून अनिका प्रयत्न करते. मात्र, कमळी प्रत्येक संकटावर मात करत पुढे जाते.

आता मात्र, कबड्डीच्या सामन्यात हरल्यामुळे टीममध्ये निवड न झाल्याने अनिकाच्या आजीने प्राचार्यांना फोन कमळीला कॉलेजमधून बाहेर काढण्यास सांगितले आहे. कारण- तिचा प्रवेश स्पोर्टस् कोट्यातून झाला होता. ती जर कॉलेजसाठी खेळू शकत नसेल, तर तिला कॉलेजमधून बाहेर काढा, असे अनिकाच्या आजीने सांगितले. त्यामुळे कमळी नाराज आहे. अशातच तिची भेट अशा व्यक्तीशी होणार आहे, जी तिला पुढच्या प्रवासाचा मार्ग दाखवणार आहे.

कमळी मालिकेत काय घडणार?

झी मराठी वाहिनीने कमळी मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, कमळी दु:खी मनाने रस्त्यावरून चालत आहे. त्यावेळी तिला कबड्डीच्या सामन्यात हरल्याचे आठवते. त्यामुळे तिला जास्त वाईट वाटते. याचदरम्यान ती समोर एका वृद्ध व्यक्तीला पाहते. त्या व्यक्तीला चक्कर येते. कमळी धावत जाते, त्या वृद्ध व्यक्तीला सावरत आजोबा तुम्हाला काय होत आहे? असे विचारते.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, आजोबा व कमळी एका ठिकाणी बसले आहेत. कमळी त्यांना सांगते की, तुम्हाला जिथं जायचं आहे, तिथं देव तुम्हाला नक्की घेऊन जाईल. आजोबादेखील कमळीला सांगतात की, वाईटावर मात करून चांगल्याचा विजय करण्यासाठी देवानं अवतार घेतला. शेवटी विजय सत्याचाच होतो.

प्रोमोच्या शेवटी कमळी त्यांच्या पाया पडताना दिसते. हा प्रोमो शेअर करताना आजोबा कमळीला पुढे जाण्याची वाट दाखवणार, अशी कॅप्शन दिली गेली आहे. आता आजोबांच्या बोलण्याचा विचार करून, तिचे दु:ख बाजूला ठेवत कठीण परिस्थितीतून कसा मार्ग काढणार, मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.