KBC 17 Independence Day Special Episode : टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती’ हा लोकप्रिय कार्यक्रम नुकताच सुरू झाला आहे. ११ ऑगस्टपासून ‘कौन बनेगा करोडपती’चा नवा म्हणजेच १७ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. या कार्यक्रमाद्वारे स्वातंत्र्यदिनाच्या विशेष भागात ‘ऑपरेशन सिंदूर‘च्या शूर सैन्य महिला अधिकारी भेटीस येणार आहेत.

कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग व कमांडर प्रेरणा देवस्थळी या महिला अधिकारी ‘कौन बनेगा करोडपती’च्या १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्याविशेष भागात सहभागी होणार आहेत. या विशेष भागाचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

या प्रोमोमध्ये कर्नल सोफिया कुरेशी म्हणतात, “पाकिस्तान असं नेहमीच करत होता. म्हणून त्यांना उत्तर देणं योग्य होतं.” त्यानंतर विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी, “पहाटे १.०५ ते १.३०… या २५ मिनिटांत खेळ संपला”, असे सांगितले. पुढे या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन ‘भारतमाता की जय’, असा नारा देतात.

हा प्रोमो समोर येताच अनेकांनी या भागाबद्दल उत्सुकता व्यक्त केली. तसेच सैन्याच्या अधिकाऱ्यांनी गणवेशात रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजेरी लावणं अनेकांना खटकलं असून, सोशल मीडियावर याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

याबद्दल एकानं असं म्हटलंय, “लष्कराच्या अधिकाऱ्यांचा अशा प्रकारे प्रचारासाठी वापर करणं म्हणजे सत्ताधाऱ्यांनी लष्कराचं राजकारणासाठी शोषण करणं आहे.” तर आणखी एकानं, “भारतीय लष्कराचं काही शिस्तबद्ध धोरण, प्रतिष्ठा व नियम आहेत. त्यांचं पालन केलं पाहिजे”. तर दुसऱ्यानं, “आपलं लष्कर हे प्रचार किंवा ब्रँडिंगसाठी नसावं. कारण- त्यांचं काम देशाचं रक्षण करणं आहे.”

शिवसेना (उबाठा) गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांनीसुद्धा त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणतात, “‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या आपल्या शौर्यवान महिला अधिकाऱ्यांना एका खासगी मनोरंजन वाहिनीवर आमंत्रित करण्यात आलं आहे. या खासगी वाहिनीचा मूळ गट – ‘सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (SPNI)’ – यांच्याकडेच आशिया कपचे २०३१ पर्यंतचे प्रसारण हक्क आहेत. होय, ही तीच वाहिनी आहे, जी भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यांतून कोट्यवधींचा व्यवसाय करत आहे. आता यातील संबंध जोडून पाहा…”

दरम्यान, लष्कराच्या गणवेशासंदर्भातील अधिकृत नियम काय सांगतात?

१. भारतीय लष्कराच्या अधिकृत गणवेश धोरणानुसार, संस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये गणवेश वापरण्यस मनाई आहे.

२. सार्वजनिक ठिकाणी, रेस्टॉरंट, प्रवासात किंवा खासगी विमानप्रवासात गणवेश घालणं नियमबाह्य आहे.

३. तसेच, अधिकृत मान्यता नसताना कोणत्याही खासगी कार्यक्रमात गणवेश वापरता येत नाही.