KBC 17 Independence Day Special Episode : टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती’ हा लोकप्रिय कार्यक्रम अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. केवळ मनोरंजनच नव्हे, तर अनेक प्रेक्षकांच्या ज्ञानातही त्यामुळे भर पडत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेकांच्या करोडपती होण्याचा स्वप्नपूर्तीचा प्रवास पाहायला मिळतो. अशातच या शोचा नुकताच नवा सीlझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
११ ऑगस्टपासून ‘कौन बनेगा करोडपती’चा नवा म्हणजेच १७ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. या कार्यक्रमात आजवर अनेक क्षेत्रांतील दिग्गज मान्यवर मंडळी आली आहेत. अशातच यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या शोच्या प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राइज असणार आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर‘च्या शूर सैन्य महिला अधिकारी येणार आहेत आणि त्याचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये कर्नल सोफिया कुरेशी म्हणतात, “पाकिस्तान असं नेहमीच करत होतं. म्हणून त्यांना उत्तर देणं योग्य होतं.”
त्यानंतर विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी, “पहाटे १.०५ ते १.३०… या २५ मिनिटांत खेळ संपला”, असे सांगितले. मग कमांडर प्रेरणा देवस्थळी यांनी “लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करून, त्यांचा नाश करण्यात आला; मात्र कोणत्याही नागरिकाचं नुकसान झालं नाही, हा नवीन विचारसरणीचा नवीन भारत आहे.” असे म्हटले. पुढे या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन ‘भारतमाता की जय’, असा नारा देतात.
दरम्यान, या प्रोमोवर प्रेक्षकांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘जय हिंद’, ‘भारतमाता की जय’ अशा कमेंट्स प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत. १५ ऑगस्ट रोजी हा स्वातंत्र्यदिन विशेष भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘कौन बनेगा करोडपती’साठी हे वर्ष खूपच खास आहे. कारण- हा शो रौप्यमहोत्सवी वर्ष साजरं करत आहे.
कौन बनेगा करोडपती प्रोमो
‘कौन बनेगा करोडपती १७’च्या पहिल्या भागामध्ये, लखनौचा मानवप्रीत हॉट सीटवर पोहोचले होते. त्यांनी २५ लाख रुपये जिंकले आहेत. नंतर ५० लाख रुपयांच्या प्रश्नावर ते अडकले. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांचा ‘पुराबी’ हा काव्यसंग्रह कोणत्या दक्षिण अमेरिकन लेखकाला समर्पित केला होता. या प्रश्नावर ते अडकले. खूप विचार केल्यानंतर त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला आणि २५ लाख रुपये घेऊन घरी परतले.