Kaun Banega Crorepati 17 Promo : टीव्हीवरील काही लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याचबरोबर त्यांच्या ज्ञानातही भर घालत आहे. या कार्यक्रमात अनेक स्पर्धक त्यांची कोट्यधीश होण्याची स्वप्नं घेऊन येतात आणि या मंचाद्वारे ते त्यांच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास करतात.

अशातच नुकताच या कार्यक्रमाचा नवा म्हणजेच १७ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि या नव्या सीझनला अवघ्या सात दिवसांतच पहिला करोडपती मिळाला आहे. याचा प्रोमोही नुकताच समोर आला आहे. उत्तराखंडच्या आदित्य कुमार यांनी एक कोटी रुपये जिंकत यंदाच्या सीझनमधले पहिला करोडपती होण्याचा मान पटकावला आहे. विशेष म्हणजे आदित्य आता सात कोटींच्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं धाडसही करणार आहे.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोमध्ये दिसतंय की, आदित्य यांनी कॉलेजच्या काळात त्यांच्या मित्रांना सांगितलं होतं की, KBC ची टीम त्यांच्याकडे येणार आहे. मित्रांनी तेव्हा खूप तयारीही केली होती; पण शेवटी कळलं की, आदित्य यांनी फक्त त्यांची मस्करी केली होती. गमतीची गोष्ट म्हणजे यावेळी खरंच KBC कडून आदित्य यांना फोन आला आणि त्यांचा प्रवास आता कोट्यधीश होण्यापर्यंत पोहोचला आहे.

प्रोमोमध्ये पुढे अमिताभ बच्चन हे आदित्य एक कोटी जिंकल्यानिमित्त आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच एक करोडच्या प्रश्नानंतर अमिताभ बच्चन आदित्य यांना पुढील सात कोटींचा प्रश्नही विचारत आहेत. तेव्हा आदित्य ‘मी रिस्क घेऊ इच्छितो’, असं म्हणतात. तर, अमिताभ बच्चनही त्यांच्या या आत्मविश्वसाचं कौतुक करतात.

त्यामुळे आता आदित्य एक कोटीच्या प्रश्नानंतर पुढील सात कोटींच्या प्रश्नाचंही योग्य उत्तर देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, ‘कौन बनेगा करोडपती’साठी हे वर्ष खूपच खास आहे. कारण- हा शो रौप्यमहोत्सवी वर्ष साजरं करीत आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ हा शो सुरू होऊन २५ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि अजूनही हा प्रवास सुरूच आहे. ‘कौन बनेगा करोडपती १७’ हा शो ११ ऑगस्ट २०२५ पासून दररोज रात्री ९ वाजता Sony TV वर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.