Archana Puran Singh On Kiku Sharda : विनोदी अभिनेता किकू शारदा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधील काही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ पहिल्यांदा जेव्हा कलर्स टीव्हीवर सुरू झाला होता, तेव्हापासून किकू कपिलबरोबर आहे. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात झालेल्या वादानंतर अनेक कलाकारांनी हा शो सोडला, पण किकू मात्र कायमच कपिलबरोबर होता आणि अजूनही आहे.
अशातच सध्या किकू ‘Rise and Fall’ नावाच्या नव्या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे, त्यामुळे असा दावा केला जात आहे की, किकूने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ सोडला आहे. तसंच कृष्णा अभिषेकशी झालेल्या कथित भांडणामुळे ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधून त्याने एक्झिट घेतल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या सर्व अफवांना शोमधील अर्चना पूरण सिंह यांनी पूर्णविराम दिला आहे.
स्क्रीनला दिलेल्या खास मुलाखतीत अर्चना यांनी स्पष्ट सांगितलं की, “ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. किकू अजूनही ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा भाग आहे.” तसंच इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार एका सूत्रानेही पुष्टी केली की, “किकूने अजून शो सोडलेला नाही. त्याने त्याचा पुढचा प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी कपिलच्या शोचं शूटिंग पूर्ण केलं आहे. तो अजूनही ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा भाग आहे.”
काही दिवसांपूर्वी कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा यांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. शोच्या रिहर्सलदरम्यान दोघेही वाद घालताना दिसले. या भांडणामुळेच किकूने शो सोडला. पण, इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या सूत्रांच्या मते हे भांडण खरं नव्हतं. दोघांनी मिळून फक्त एका पाहुण्यासाठी मजेत एक प्रँक केला होता. त्यानंतर दोघांनी शोचे एकत्र चित्रीकरण केले.” एकंदरीतच किकू अजूनही कपिलच्या टीमबरोबर आहे आणि त्याने शो सोडलेला नाही. त्याने शो सोडल्याच्या अफवा असल्या तरी सत्य वेगळंच आहे.
दरम्यान, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ व्यतिरिक्त किकू आता MX Player वरील नवीन रिअॅलिटी शो ‘Rise and Fall’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे. हा शो येत्या ६ सप्टेंबरपासून पाहता येणार आहे. या शोचं सूत्रसंचालन अशनीर ग्रोव्हर करत असून इतर सहभागी कलाकारांमध्ये अर्जुन बिजलानी, धनश्री वर्मा, आकृती नेगी, कुब्रा सैत आणि अरबाज पटेल यांचा समावेश आहे.