Kiku Sharda Shares Memory of Mother and Father : मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळींना अनेकदा त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य टिकवून ठेवत काम करावं लागतं. वैयक्तिक आयुष्यात कितीही दु:ख आलं, तरी ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत आपलं काम इमाने इतभारे करावं लागतं. विनोदी कलाकारांच्या आयुष्यात तर असे अनेक प्रसंग येतात, जिथे वैयक्तिक आयुष्यात कितीही दु:खद घटना घडलेल्या असल्या, तरी प्रेक्षकांना त्यांना हसवणं गरजेचं असतं.
आयुष्यातील याच कठीण प्रसंगाबद्दल एका विनोदी अभिनेत्याने त्याची एक जुनी भावुक आठवण सांगितली आहे, हा विनोदी अभिनेता म्हणजे किकू शारदा. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा किकू सध्या Rise And Fall या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे.’ अशातच या शोच्या नुकत्याच झालेल्या भागात एक अनपेक्षित आणि भावनिक वळण पाहायला मिळालं.
News 18 च्या वृत्तानुसार, Rise And Fall मधून प्रसिद्ध कुस्तीपटू संगीता फोगटला कौटुंबिक कारणामुळे अचानक बाहेर पडावं लागलं. सासऱ्यांच्या निधनामुळे संगीताने या शोमधून एक्झिट घेतली. यामुळे घरातील सगळेच सदस्य भावुक झाले आणि सर्वांना हसवणारा कॉमेडियन किकू शारदासुद्धा स्वतःच्या आयुष्यातील दुःखद आठवणींनी व्यथित झाला.
संगीता फोगटला सासऱ्यांच्या निधनाची बातमी कळताच तिने शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिला शोमधून निरोप देताना अनेकजण भावना अनावर होऊन रडू लागले. याचवेळी किकूने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक दु:खद किस्सा शेअर केला.
याबद्दल तो म्हणाला, “दोन वर्षांपूर्वी मी अमेरिकेत होतो आणि तिथे असताना माझ्या आईचं निधन झालं. त्यावेळी मी विमानतळावर होतो, मी एक अभिनेता आहे, लोक फोटोसाठी येत असतात, तसंच त्यादिवशीसुद्धा येत होते… मी त्यांना फोटो तर दिले; पण मी आतून तुटलो होतो.”
यापुढे त्याने सांगितलं, “आईचा शेवटचा फोनही मी उचलला नाही. मी म्हणालो उद्या फोन करतो, आज खूप काम आहे… पण दुसऱ्या दिवशी ती नव्हती. त्यानंतर ४५ दिवसांनी वडिलांचं निधन झालं. ते हे दु:ख पचवू शकले नाहीत. एका वयानंतर आपल्या पालकांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. त्यामुळे मी फक्त एवढंच सांगतो, आपल्या जवळच्या माणसांना वेळ द्या. त्यांना कॉल करा, त्यांच्या कायम संपर्कात राहा.”
Rise And Fall या रिअॅलिटी शोमध्ये दर आठवड्याला काही ना काही नवं, धक्कादायक आणि भावनिक घडतंय. स्पर्धकांच्या एक्झिट्सपासून ते त्यांच्यातील वादांपर्यंत शोमध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे हा शो प्रेक्षकांना चांगलाच खिळवून ठेवत आहे, प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.