९०च्या दशकात मराठी सिनेसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि जबरदस्त नृत्य कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या किशोरी शहाणे सोशल मीडियावरही तितक्याच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्या त्यांचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असतात.
किशोरी शहाणे सोशल मीडियावरील अनेक ट्रेंड्सही फॉलो करताना दिसतात. किशोरी शहाणे सोशल मीडियावर त्यांच्या लेकाबरोबरचे अनेक फोटो शेअर करत असतात. तसंच विविध गाण्यावरील डान्स व्हिडीओही शेअर करताना दिसतात. अशातच त्यांनी नुकताच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
लोकप्रिय मराठी गाण्यावर किशोरी शहाणे यांनी एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे, यात त्यांच्याबरोबर काही इतर मराठी अभिनेत्री सुद्धा आहे, या व्हिडीओमध्ये या सर्व अभिनेत्रींचा मराठमोळा लूक लक्ष वेधून घेत आहे. किशोरी शहाणेंनी सायली देवधर, प्राजक्ता हनमघर, स्नेहल शिदम, सूचिका जोशी या अभिनेत्रींसह ‘आली ठुमकत नार…’ या गाण्यावर रील व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत त्या म्हणतात, “नवीन मित्र… नवीन रील… जेव्हा एखादं नवीन प्रोजेक्ट किंवा प्रवास सुरू करतो, तेव्हा मनात थोडी शंका असतेच. पण अनुभवातून मी एक गोष्ट शिकले आहे – जे जसं येईल, तसं स्वीकारायचं. सकारात्मक गोष्टींमध्ये स्वतःचं समाधान शोधायचं आणि जे अस्वस्थ करतं; त्याकडे दुर्लक्ष करायचं.”
यापुढे त्या म्हणतात, “आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे आणि तो आनंदात पार करायचा असतो. या चित्रपटाचं शूटिंग, कॅमेरासमोर आणि कॅमेरामागेही खूप मजेदार होतं. नवीन मित्र भेटले, छान लोकेशन्स अनुभवली. सगळं काही खूप खास होतं.” या व्हिडीओमध्ये किशोरी शहाणेंनी नऊवारी साडी परिधान केली आहे. तसंच सायली देवधरही नऊवारी साडीत पाहायला मिळत आहे.
तसंच अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, स्नेहल शिदम, सूचिका जोशी यांनीसुद्धा सुंदर अशा पैठणी परिधान केल्या असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. किशोरी शहाणेंनी शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
अनेक चाहत्यांनी या व्हिडीओमधील अभिनेत्रींच्या मराठमोळ्या लूकचे कौतुक केलं आहे. “खूप छान, किती सुंदर, कमाल, या साड्यांमध्ये सगळ्याच किती सुंदर दिसत आहात, नजर नको लागू दे” या आणि अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी या व्हिडीओवर व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, किशोरी शहाणे यांनी आजवर अनेक मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. गेली अनेक दशके ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. याशिवाय बिग बॉस मराठी सारख्या रिअॅलिटी शोमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता.