Know Education of Suruchi Adarkar: चित्रपट, मालिका, नाटक यांमध्ये दिसणार्या कलाकारांविषयी जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. आपल्या आवडत्या कलाकारांच्या नात्यांविषयी, त्यांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्याचा प्रेक्षक प्रयत्न करताना दिसतात.
अभिनेत्री सुरुची अडारकर लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. ‘का रे दुरावा’ या मालिकेतून अभिनेत्रीला मोठी लोकप्रियता मिळाली. ‘उंच माझा झोका’, ‘वो तो है अलबेला’, ‘पहचान’, ‘आपलं बुवा असं आहे’ या मालिकांतही तिने काम केले आहे. याबरोबरच, ती ‘घात’, ‘बाईपण भारी देवा’, ‘मात’ अशा काही चित्रपटांतही काम करताना दिसली आहे. अभिनेत्री काही दिवसांपूर्वीच सुयश टिळकबरोबर ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
सुरुची अडारकर काय म्हणाली?
चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री सुरुची अडारकरचे शिक्षण किती आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
सुरुचीने नुकतीच ‘लोकमत’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिचे आई-वडील तिचे सर्वार्थाने गुरू असल्याचे सांगितले. अभिनेत्री असेही म्हणाली की, माझ्या कुटुंबातील कोणीही अभिनय क्षेत्रात नव्हतं, त्यामुळे मी जेव्हा अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या मनात धाकधूक होती. दहावीनंतर मला अभिनय क्षेत्रात रुची निर्माण झाली.
“या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितल्यानंतर आईला काळजी वाटत होती. पण, वडिलांनी पाठिंबा दिला. आयुष्यातील प्रसंगांना त्यांनी बेधडकपणे सामोरे जायचं असं सांगितलं. मात्र, त्यावेळी बाबांनी सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत शिक्षण सोडायचं नाही, कारण शिक्षणामुळे व्यापक दृष्टी मिळते. प्रगती होते.”
सुरुचीचे शिक्षण किती?
स्वत:च्या शिक्षणाबाबत अभिनेत्री म्हणाली की मी एम. ए. केलं आहे. आता मला पीएच. डी. करायची आहे. पुढे अभिनेत्रीने करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिच्याबरोबर घडलेला किस्सादेखील सांगितला.
सुरुची म्हणाली, “एकदा मला हिंदी व मराठीतील दोन्ही मालिकांच्या ऑफर्स एकाच वेळेस आल्या. हिंदी मालिकेसाठी मी होकार दिला. मराठी मालिकेला मी नकार दिला. मात्र, हिंदी मालिकेच्या टीमकडून काहीच संपर्क झाला नाही. मी चौकशी केल्यानंतर मला समजलं की ती मालिका होणार नाही. मग मी मराठी मालिकेच्या टीमला विचारले तर तोपर्यंत त्यांची कास्टिंग पूर्ण झाली होती.”
“घरी आल्यानंतर आईला सांगितलं. मी रडत होते, तेव्हा तिने मला सांगितलं की तू रड; कदाचित यातून बाहेर पडण्यासाठी तुला वेळ लागेल. पण, डोळे पुसायचे आणि स्वत:साठी उठायचं. माझी आई माझी प्रेरणा आहे. तिने मला खूप हिंमत दिली. त्यानंतर मी निराश न होता भक्कमपणे उभी राहिले”, असे म्हणत अभिनेत्रीने खचल्यानंतर आईने साथ दिल्याचे सांगितले.
दरम्यान, अभिनेत्री झी मराठीच्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतदेखील दिसली होती.