Ankita Walawalkar : महाराष्ट्रात गणेशोत्सवादरम्यान गौराईचा सण देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गौरी आवाहन, गौरीपूजन हा सण महिलांसाठी खूपच खास असतो. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात गौरीपूजन करण्याची पद्धत वेगवेगळी असते. कोकणात गौरीपूजेला विशेष महत्त्व आहे. गौरी पूजनातील एक महत्त्वाची प्रथा म्हणजे ओवसा, कोकणात ही परंपरा आजही जपलेली आहे. नववधुसाठी पहिला ओवसा फार महत्त्वाचा असतो.
कोकणात “आली गवर आली, सोनपावली आली” असं म्हणत मोठ्या उत्साहात गौराईचं स्वागत केलं जातं. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर सुद्धा यंदा लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव साजरा करत आहे. माहेरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून गौरीपूजनासाठी अभिनेत्री सासरी पोहोचली आहे. अंकिताने कोकणातील परंपरेनुसार तिचं पहिलं गौरीपूजन केलं. यावेळी तिच्या सासूबाई व पती कुणाल हे दोघेही उपस्थित होते.
पहिला ओवसा हा नव्या नवरीसाठी खूपच महत्त्वाचा असतो. ओवशामुळे सुपांना देखील फार महत्त्व आहे. एका सुपात पाच प्रकारच्या भाज्या, पाच प्रकारच्या वेलींची पाने, पाच प्रकारची फळे, करंडा फणी, ओटी, अशी पाच सुपं गौरीसमोर ठेवली जातात. सुहासिनींकडून गौरीची विधिवत पूजा केली जाते. ( ओवशाच्या सुपात काय ठेवायचे हे सुद्धा प्रातांनुसार बदलते ) नवविवाहित स्त्रिया ही भरलेली सुपे घेऊन अनवाणी चालत गौरीसमोर जातात. अंकिताने सुद्धा कोकणातील या परंपरेनुसार तिची पहिली गौरीपूजा केली आहे. याचा सुंदर व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अंकिता डोक्यावर सुपे घेऊन जात असताना कुणाल आणि तिच्या सासूबाई देखील सोबतीला होत्या.
गौरीपूजनासाठी अंकिता सुंदर अशी साडी नेसून, पारंपरिक लूक करून तयार झाली होती. या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “खूप गोड दिसतेस अंकिता नजर काढ”, “आमच्या कोकणातील प्रथा”, “ही खरी आपली संस्कृती-हिच खरी आपली परंपरा”, “अंकिता अप्रतिम” अशा असंख्य कमेंट्स अंकिताच्या या व्हिडीओवर युजर्सनी केल्या आहेत.
दरम्यान, यंदा अंकिता व तिचा पती कुणाल या दोघांनी देवबाग ( अंकिताचं माहेर ) आणि अलिबाग या दोन्हीकडच्या बाप्पाची मनोभावे सेवा केली. याशिवाय या दोघांनी मुंबईत येऊन चिंचपोकळीच्या चिंतामणीचं सुद्धा दर्शन घेतलं.