अभिनेत्री कुनिका सदानंद सध्या ‘बिग बॉस १९’ मध्ये आहे. कुनिकाने तिने तिच्या अफेअरबद्दल जाहिरपणे सांगितलं होतं. तसेच ती व गायक कुमार सानू लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते, असा खुलासा तिने काही दिवसांपूर्वी केला होता. आता कुनिकाचा मुलगा अयान लालने त्याच्या आईच्या रिलेशनशिपबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा त्याची गर्लफ्रेंड होती, तेव्हा त्याच्या आईचाही एक बॉयफ्रेंड होता, असं अयानने म्हटलंय.
अयान लालने खुलासा केला की तो व त्याची आई दोघेही एकाच वेळी रिलेशनशिपमध्ये होते, त्यामुळेच त्यांच्यात चांगली मैत्री झाली. एका मुलाखतीत आई व कुमार सानू यांच्या नात्याबद्दल अयान म्हणाला, “जेव्हा मला गर्लफ्रेंड होती, तेव्हा माझ्या आईचे बॉयफ्रेंड होते.” आईचं नातं २७ वर्षांचं नव्हतं, तर ती २७ वर्षांची असताना या नात्यात आली होती, असं कुनिकाच्या मुलाने स्पष्ट केलं.
कुनिकाचं अफेअर अयानच्या जन्माआधी होतं. आतापर्यंत अयान कधीच कुमार सानूला भेटला नाही, पण त्यांचा मुलगा जानबरोबर मैत्री असल्याचं त्याने सांगितलं. अयानचे आई-वडील विभक्त झाले आहेत. त्याचे वडील अमेरिकेत राहतात. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अयानने त्याच्या आईच्या डेटिंग लाईफबद्दल भाष्य केलं. घटस्फोटानंतर ती खूप एकटी होती आणि तिला सहवासाची नितांत गरज होती. तिच्या आयुष्यात अनेक पुरुष आले आणि त्यांनी त्यांचे नातेसंबंध कोणत्याही कटुतेशिवाय संपवले. “त्यापैकी काही चांगले पती होते, तर काही चांगले वडील होते, पण त्यांचे नाते पुढे गेले नाही,” असं अयान आईच्या बॉयफ्रेंडबद्दल म्हणाला.
कुमार सानू व आईच्या नात्याबद्दल अयान म्हणाला….
अयानला त्याची आई आणि कुमार सानूच्या अफेअरबद्दलही विचारण्यात आलं. “मी तिला घरी दिवसभर त्यांची गाणी गाताना पाहिलंय. मी गंमत करतोय. पण तिला खरंतर ते एक गायक म्हणून खूप आवडतात. ती अजूनही त्यांची गाणी म्हणते. त्यांचं अफेअर २७ वर्षे टिकलं, असं लोक म्हणत आहेत, पण तसं नव्हतं. ती २७ वर्षांची असताना त्यांच्या प्रेमात पडली होती. त्यांचं नातं काही वर्षे टिकलं, नंतर ते वेगळे झाले. तिने ३५ व्या वर्षी मला जन्म दिला होता,” असं अयान म्हणाला.
अयान पुढे म्हणाला, “ती त्यांच्या कलेवर खूप प्रेम करते. मी खात्रीने सांगू शकतो की आता तिचं त्यांच्यावर प्रेम नाही. माझी आई प्रेमात वेडी होणारी महिला नाही. जेव्हा मला त्यांच्याबद्दल समजलं आणि मी गुगलवर माहिती शोधली तेव्हा तिला सगळं विचारलं. ती म्हणाली, ‘तो माझ्या आयुष्यातील एक खूप महत्वाचा भाग होता. मी त्याला माझा जोडीदार समजायचे, प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अशा प्रकारचे प्रेम अनुभवले पाहिजे.’ पण त्यांचं नातं खूप विषारी होतं,” असं अयानने नमूद केलं.