‘लागिरं झालं जी’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. १ मे २०१७ रोजी ही मालिका सर्वांच्या भेटीला आली होती, आणि पुढे जवळपास २ वर्षे या मालिकेने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अज्या अन् शितलीची लव्हस्टोरी प्रत्येकाच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेतील सहायक कलाकार सुद्धा घराघरांत लोकप्रिय झाले.

‘लागिरं झालं जी’ या मालिकेत राहुल्याची भूमिका साकारणारा अभिनेता राहुल मगदूमने वैयक्तिक आयुष्यातील एक खास गोष्ट नुकतीच प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे. अभिनेत्याने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन गाडी खरेदी केली आहे.

गाडी खरेदी केल्यावर राहुलने त्याच्या आयुष्यातील भावुक आठवणींना उजाळा देत चाहत्यांसह प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. नव्या गाडीचं राहुलने अगदी राजेशाही थाटात स्वागत केलं. या नव्या गाडीचे फोटो व व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अभिनेता राहुल मगदूमची पोस्ट

आता पुढचा प्रवास वातानुकूलित Self Gifted कारने करावा म्हणतो…काय म्हणता?

माझ्या लहानपणापासून एस.टी. बस हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. प्रवास तर तोच असतो. पण, एसटीने प्रवास करताना खूप आनंद व्हायचा. लहानपणी आई-बाबांबरोबर प्रवास करायचो. माझे मोठे काका तर कोकणात मालवण येथे एसटी डेपोत ड्रायव्हर होते. त्यामुळे कोकणात लहाणपणापासूनच येणं-जाणं व्हायचं. तेव्हापासून एसटी मनात रुतली कायमचीचं. पत्र्याचा खर-खर आवाज, गियरची धडधड, काचेची कर-कर पण, खरंच निवांत झोप लागते लाल डब्यात…. आणि हे खरंच आहे. अतिशयोक्ती अजिबात नाही. मला एसी स्लीपर ट्रॅव्हल्समध्ये फार कमी झोप लागते. कारण, माहीत नाही पण एसटीच्या त्या आवाजात काहीतरी अकल्पित, अनन्यसाधारण असं काहीतरी होतं इतकंच सत्य.

माझ्याकडे पोलो कार होती सेकंड हँड त्या जुन्या गाडीपेक्षा जास्त फिरलोय मी लाल डब्यातून. कधी कधी कार एसटी स्टँडला लावून पावसात एकटाच गेलोय कोकणात. एसटीची साथ अजूनही आठवते. माझ्यापेक्षा जास्त माझ्या मित्रांना. असो आज तुमच्या प्रेमामुळे आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने नवीन गाडी घेतली. आता प्रवासात एसी असेलच… लाल डब्यात धक्के लागायचे, घाम निघायचा पण सुखाची झोप लागायची. आता स्वतःच्या गाडीत किती झोप लागेल माहीत नाही. पण, एसीमध्येही कष्टाचा घाम येऊदे इतकीच प्रार्थना…

View this post on Instagram

A post shared by Rahul Magdum (@rahulmagdum3003)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राहुलचे मित्रमंडळी, तसेच ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील त्याचे सहकलाकार या नव्या गाडीसाठी राहुलवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.