Dnyanada Ramtirthkar Admitted To Hospital Shares Health Update : छोट्या पडद्यावरील कलाकारांना मालिकांसाठी सलग १० ते १२ तास किंवा त्याहूनही अधिक वेळ शूटिंग करावं लागतं. त्यात कार्यक्रम, महाएपिसोडचं शूट असल्यास या कलाकारांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर होतो, त्यात सध्या पावसाळा सुरू असल्याने ताप-सर्दीची साथ पसरली आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरी आणि ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील प्राप्ती रेडकरला प्रकृतीच्या कारणास्तव मालिकेतून काही दिवस ब्रेक घ्यावा लागला होता. जुई आणि प्राप्ती यांनी फोटो शेअर करत त्यांच्या प्रकृतीची अपडेट चाहत्यांना दिली होती. आता या पाठोपाठ ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या ज्ञानदा रामतीर्थकरची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे.
ज्ञानदाने हाताला सलाईन लावलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीचा चेहरा पाहूनच तिची प्रकृती बिघडल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे.
ज्ञानदा रामतीर्थकरची पोस्ट
ज्ञानदा रामतीर्थकर पोस्ट शेअर करत लिहिते, “मुंबई लोकल’चं प्रमोशन आहे… ज्ञानदा कुठे आहे? मालिकेचे २०० एपिसोड पूर्ण झाले, सेलिब्रेशनमध्ये ज्ञानदा कुठे आहे? तुमची अप्पू, काव्या म्हणजेच ज्ञानदा सध्या थोडा आराम करतेय. गेले काही दिवस व्हायरल फिव्हरबरोबर ( ताप ) माझं भांडण चालू आहे पण, लवकरच परत एकदा नवीन एनर्जी घेऊन तुम्हा सर्वांचं मनोरंजन करायला मी येतेय. तुमचं प्रेम, आशीर्वाद माझ्याबरोबर आणि माझ्या सगळ्या प्रोजेक्टबरोबर कायम ठेवाय याची मला खात्री आहे. ‘मुंबई लोकल’ हा माझा सिनेमा १ ऑगस्टला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका रोज ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर संध्याकाळी सात वाजता नक्की पाहा.”

दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत सध्या काव्या-पार्थ आणि जीवा-नंदिनी यांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं पाहायला मिळत आहे. आता पुढच्या सहा महिन्यांत या चौघांचं नातं कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.