Lagnanantar Hoilach Prem fame actress shares anecdote: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका सध्या मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे. या मालिकेतील जीवा, नंदिनी, काव्या, पार्थ प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहेत. या पात्रांबरोबरच मालिकेत पार्थवर जीवापाड प्रेम करणारी रम्यादेखील दिसते.
पार्थबरोबर लग्न करण्यासाठी रम्याने अनेक प्रयत्न केले. मात्र, तिचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. आता काव्या व पार्थचे लग्न झाल्यानंतरही पार्थ तिच्या प्रेमात पडावा, यासाठी ती अनेक प्रयत्न करताना दिसते. मालिकेतील रम्या हे पात्र अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने साकारले आहे.
कश्मिरा कुलकर्णी काय म्हणाली?
आता कश्मिरा कुलकर्णी तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. मेडिकल कॅम्पला गेल्यावर घडलेला एका प्रसंग तिने सांगितला. अभिनेत्रीने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “मला खूप मोठं अन्नछत्र काढायचं आहे. तिथली आजूबाजूची लोक उपाशी राहिली नाही पाहिजेत, कारण- आपण ते उपाशी राहणं पाहिलं आहे. एकदा आम्ही रायगड जिल्ह्यात मेडिकल कॅम्पसाठी गेलो होतो.
तिथे एक छोटासा मुलगा आला. छोट्या गावात, आदिवासी पाड्यांमध्ये लहान मुलं डॉक्टरांना पाहून घाबरतात. मग आमचं असं ठरलेलं असतं की डॉक्टर थोडावेळ गाडीत बसणार. मी जाऊन त्या लहान मुलांना चॉकलेट वगैरे देते. मग परिस्थिती थोडीसी सामान्य झाली की मग डॉक्टर येतात. त्यांना तपासतात.”
तिथल्या एका मुलाला मी विचारलं की तू जेवलास का? तर तो म्हणाला की हो. मी त्याला विचारलं की काय खाल्लंस? तर तो मला म्हणाला की मी उंदिर खाल्ला. ते ऐकल्यानंतर माझ्या अंगावर काटा आला. तिथे एक मावशी बसल्या होत्या. त्या म्हणाल्या त्याचे आई-वडील नाहीत. तो असच काहीही पडलेलं खातो. पण तरीही मला असं वाटलं की उंदीर का खाल्ला? मला असं वाटलं की याच्या घरी दुसरं कोणी नाही का? तर त्याचे काका आणि मावशी आहेत, असं समजलं. मग तेवढ्यात ते आले.
त्या मुलाच्या मावशीचं असं म्हणणं होतं की सरकारने आता धान्य द्यायची सोय केली आहे. ते दर महिन्याला धान्य देतात. मग पुरुषांची अशी विचारसरणी झाली की आता घरी खायला अन्न मिळत आहे. तर मग कमवायचं नाही आणि कमावलं तरी दारू पिऊन मारहाण करायची. मग मी विचार केला की आपण जर अन्न पुरवलं तर मग ते काम करणार नाहीत.”
“मग मी असं ठरवलं की आपण असं काहीतरी करूयात की जेणेकरून त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यास मदत होईल. तयार गोष्टी हातात द्यायच्या नाहीत. त्यांचं कर्म हातून काढून घ्यायचं नाही. नाहीतर आपल्यामध्ये कुठे ना कुठे त्याचंसुद्धा प्रारब्ध येतंच.”
“त्यानंतर बायकांना होणारा त्रास, आईने जो संघर्ष पाहिला, त्यातून सुकन्या गृहोद्योग सुरू केला. त्यामध्ये आता मसाले बनवणं, केटरिंगचे ऑर्डर्स घेणं, सीझननुसार दिवाळीचा फराळाच्या ऑर्डर्स, पुरणपोळी, आकाशदिवा तयार करणे या सगळ्या गोष्टी चालू असतात.असं काहीतरी चालू आहे. जेणेकरून ज्यांना गरज आहे, त्यांनी यावं, तुमच्या कष्टाचं आहे, ते त्यांना मिळावं. यामुळे त्यांना स्वावलंबी होणं समजावं आणि कष्टाचं महत्व समजावं तसेच त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहता यावं.”
दरम्यान, आता लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.