Lagnanantar Hoilach Prem Fame Actor Vivek Sangle New Home : मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रसिका धामणकर यांच्या लेकीने आपल्या आईसाठी नवीन घर खरेदी केल्याचं पाहायला मिळालं. आता यानंतर मराठी मालिका विश्वातील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याने मुंबईत नवीन घर खरेदी करून आपल्या आई-बाबांची स्वप्नपूर्ती केली आहे.

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच विवेक सांगळे. ‘भाग्य दिले तू मला’, ‘लव्ह लग्न लोचा’, ‘आई माझी काळूबाई’, ‘देवयानी’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या मालिकांमुळे अभिनेता घराघरांत लोकप्रिय झाला. सध्या विवेक ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत जीवा ( जन्मजेय देशमुख ) ही भूमिका साकारत आहे. अभिनेत्याने गेली अनेक वर्षे विविधांगी भूमिका साकारून आपल्या चाहत्यांच्या मनात घर केलं आहे आणि इतकी वर्षे इंडस्ट्रीत मेहनत केल्यावर आता खऱ्या आयुष्यातही विवेकचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे.

विवेक सांगळेने मुंबईतील लालबाग-परळ परिसरात फ्लॅट खरेदी केला आहे. नुकतीच त्याच्या नव्या घरी वास्तुशांती पूजा पार पडली. यावेळी अभिनेत्याने त्याच्या आई-वडिलांसह या नव्या घरात गृहप्रवेश केला. या शुभप्रसंगी विवेकचे कुटुंबीय आणि त्याचा इंडस्ट्रीतील जवळचा मित्र संग्राम समेळ देखील उपस्थित होता.

विवेकने नव्या घराचं इंटिरियर खूपच सुंदर केलेलं आहे. ‘Elements 5 Design Studio’ या इन्स्टाग्राम पेजवरून त्याच्या नव्या घराची पहिली झलक शेअर करण्यात आली आहे. अभिनेत्याच्या घरात एन्ट्री घेताच प्रशस्त हॉल आणि त्यापुढे फ्रेंच विंडो बाल्कनी पाहायला मिळतेय. याशिवाय लिव्हिंग रुममध्ये अभिनेत्याने त्याने आतापर्यंत जिंकलेले पुरस्कार देखील ठेवले आहेत.

विवेकवर सध्या संपूर्ण कलाविश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान, विवेक सांगळेची मुख्य भूमिका असलेली ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका रोज सायंकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित केली जाते. त्याच्यासह या मालिकेत मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विजय आंदळकर, अविनाश नारकर आणि ऋजुता देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.