Lagnanantar Hoilach Prem 11 Aug Promo : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत सध्या पिहूला नेमका कोणता मानसिक त्रास होतोय हे जाणून घेण्यासाठी नंदिनी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय. भर लग्नमंडपातून नंदिनीला किडनॅप करण्याचा प्लॅन दुसऱ्या-तिसऱ्या कोणाचा नसून हा प्लॅन खुद्द वसु आत्यांचा होता हे सत्य पिहूने ऐकलेलं असतं. मात्र, यानंतर तिच्यावर मानसिक परिणाम होतो. वसुंधरा सुद्धा पिहू घरात काहीच सांगणार नाही याची पुरेपूर काळजी घेते.
नंदिनीला मात्र पिहुची मनापासून काळजी वाटत असते. ती नक्कीच कोणत्यातरी त्रासात आहे याची जाणीव तिला होते. यामुळेच जीवाशी बोलून ती घरी मानसिक समुपदेशकांना बोलावून घेते. नंदिनीच्या या निर्णयामुळे आपला सगळा प्लॅन उघड होईल याची खात्री रम्या आणि वसु आत्याला असते. त्यामुळे या मायलेकी मिळून मंजूचे कान भरतात. तुझ्या मुलीला वेडं ठरवण्यासाठी नंदिनी हे सगळं करतेय असंही सांगतात.
वसु आत्याने कान भरल्यामुळे मंजू प्रचंड संतापते आणि नंदिनीवर, “हे सगळं तू मुद्दाम करतेस” असा आरोप करते. पण, नंदिनी सुद्धा मोठ्या हुशारीने हे सगळं वसु आत्यांनी मंजूच्या डोक्यात भरलंय हे लगेच ओळखते. आता पिहू बरी झाल्यामुळे नंदिनीच्या हाती वसु आत्याविरोधात एक मोठा पुरावा लागणार आहे.
आत्या तुम्ही चौघांच्या आयुष्याचा शेवट केला – नंदिनी
लग्नमंडपातून तिला किडनॅप करण्यामागे वसु आत्यांचा प्लॅन होता हे सत्य नंदिनीसमोर आलेलं आहे. आता नंदिनी न घाबरता वसु आत्याला घरातील सगळ्यांसमोर जाब विचारणार आहे. यावेळी ती भयंकर संतापलेली असते. वसु आत्यांच्या एका कारस्थानामुळे चौघांच्या आयुष्याची माती झाली या विचाराने नंदिनीचे डोळे पाणावलेले असतात आणि तिला प्रचंड राग आलेला असतो.
नंदिनी म्हणते, “शत्रू घरातलाच असेल तर काय करायचं आत्या? हे मी तुम्हाला विचारतेय कारण, तुम्ही आम्हा चौघांच्या आयुष्याचा शेवट केलाय. दीपकशी हातमिळवणी करून मला किडनॅप केलंत…या सगळ्यामागे वसु आत्या होत्या.”
नंदिनीचा खुलासा ऐकून मानिनी विक्रमसह सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. इतकंच नव्हे तर आत्या सुद्धा प्रचंड घाबरते. हा विशेष भाग येत्या ११ ऑगस्टला संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेच्या या जबरदस्त प्रोमोवर सध्या असंख्य कमेंट्स येत आहे. यामध्ये काही युजर्सनी, “आता हे फक्त स्वप्न नसावं आणि खरंच नंदिनीने तिला जाब विचारला पाहिजे आणि लग्नाचं सत्य सर्वांसमोर आलं पाहिजे” अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता हे स्वप्न आहे की सत्य याचा उलगडा ११ ऑगस्टला होईल.