Lagnanantar Hoilach Prem Promo : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत नंदिनीने संपूर्ण देशमुख कुटुंबीयांसमोर वसु आत्याचा खोटेपणा उघड केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पियुला नेमकं काय झालंय याचा शोध नंदिनी घेत होती. पियुशी प्रेमाने संवाद साधल्यावर तिच्यासमोर वसु आत्याचा कपटी डाव उघड होतो. आता काही करून शांत बसायचं नाही, वसु आत्याला सर्वांसमोर जाब विचारायचा असा निर्णय नंदिनी घेते.

नंदिनी संपूर्ण देशमुख कुटुंबीयांसमोर वसु आत्याला तिने केलेल्या क्रूर कृत्याचा जाब विचारते. पण, अपेक्षेप्रमाणे वसु आत्या सर्वांसमोर नंदिनीला तोंडावर पाडण्याचा प्रयत्न करते.

यानंतर नंदिनी पियुला खाली घेऊन येते आणि वसु आत्या आणि रम्यामध्ये काय बोलणं झालेलं? तू त्यांच्या खोलीबाहेरून नेमकं काय ऐकलं होतंस? ते सर्वांना सांग असं सांगते. पियु सुद्धा मोठ्या धीराने जे काही आहे ते खरं-खरं सर्वांना सांगते. यानंतर रम्या या वादाच्या मध्ये पडते आणि पियु यापूर्वीही खोटं बोलली होती, त्यामुळे तिच्यावर विश्वास कसा ठेवणार असा सवाल नंदिनीला करते.

रम्या आणि वसु आत्याला वाटतं आता नंदिनी रडत-रडत सगळं स्वीकारून गप्प बसेल पण, ती न डगमगता रम्याच्या तोंडावर सांगते, फक्त २४ तास दे…वसु आत्याचा गुन्हा पुराव्यासकट मी सर्वांसमोर उघड करते. नंदिनीने अशाप्रकारे सत्य उघड करण्याचं चॅलेंज सर्वांसमोर स्वीकारलेलं आहे. आता आगामी भागात नंदिनी पुरावा म्हणून देशमुखांसमोर कोणाला उभं करणार? ती व्यक्ती नेमकी कोण असेल? याचा उलगडा होणार आहे.

नंदिनीने स्वत: २४ तासांचं चॅलेंज स्वीकारलेलं असतं आणि हा कालावधी पूर्ण व्हायची वेळ आल्यावर रम्या नंदिनीची बॅग उचलून, तिचं सगळं सामान घराबाहेर काढण्याच्या तयारीत असते. काव्या या गोष्टीला विरोध करण्याचा प्रयत्न करत असते, रम्या आणि काव्यामध्ये आणखी वाद होणार इतक्यात नंदिनी सगळ्यात मोठा पुरावा घेऊन पुन्हा घरी परतते. तिच्याबरोबर असतो दीपक, याच्याच मदतीने वसु आत्याने नंदिनीला भर लग्नातून किडनॅप करण्याचा प्लॅन बनवलेला असतो.

दीपकला पाहताच वसु आत्या आणि रम्याच्या चेहऱ्यावर बारा वाजतात. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये आनंद व्यक्त केला आहे. “नंदिनी बोलून नाही करून दाखवते”, “जबदस्त प्रोमो” म्हणत सर्वजण हा भाग पाहण्यासाठी आतुर आहेत. पण, ऐनवेळी दीपकने पलटी मारू नये, नंदिनीच्या बाजूने बोलावं असंही अनेकांनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, नंदिनीने वसु आत्यांचा खरा चेहरा उघड केल्यावर रम्या आणि वसुंधरा या मायलेकी घरात राहणार की घर सोडून जाणार हे आगामी भागात पाहायला मिळेल.