Lagnanantar Hoilach Prem : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत डिनर डेटला गेल्यावर जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थ यांच्या नात्याची नवीन सुरुवात होईल असा अंदाज सगळ्यांनाच होता. पण, प्रत्यक्ष मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

पार्थ काव्याला लाँग ड्राइव्हला घेऊन जातो आणि नंदिनी-जीवा ठरल्याप्रमाणे डिनर डेटला जातात. सगळं काही सुरळीत होणार असा काव्याचा अंदाज असतो…इतक्यात पार्थ तिला म्हणतो, “तुम्ही माझ्यासाठी इतकं करू नका. माझ्यासाठी श्रीखंड बनवणं, माझ्यासाठी डबा घेऊन येणं… तुम्ही हे सगळं आयुष्यभर माझ्यासाठी नाही करणार… प्लीज हे सगळं करू नका कारण, तुम्ही हे सगळं करत राहिलात तर, मी तुमच्या प्रेमात पडेन काव्या… आता एकच उपकार करा माझ्यावर मला मोकळं करा काव्या” हे ऐकून काव्याचे डोळे पाणावतात.

नंदिनी सुद्धा जीवाला म्हणते, “सही करून आपलं नातं संपवून टाका” यावेळी तिलाही अश्रू अनावर झालेले असतात. खरंतर, नंदिनी डिनर डेटला आल्यावर अशाप्रकारे घटस्फोट मागेल असं जीवाच्या ध्यानीमनी सुद्धा नसतं. पण, नंदिनी भविष्याचा विचार करते… जीवा कसा वागेल, तो त्याच्या भूतकाळातील मुलीला विसरेल का? हा सगळा विचार करून घटस्फोट घेण्याच्या निर्णयापर्यंत ती पोहोचलेली असते.

नंदिनी आणि जीवा हे दोघंही आता विभक्त होण्याची शक्यता आहे कारण, लग्नानंतर अवघ्या ५ महिन्यांत या दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. यावर त्यांना सांगण्यात येतं की, “घटस्फोट घेण्याआधी तुम्हाला कायद्यानुसार किमान सहा महिने एकत्र राहावं लागेल. हवं तर ही तुमच्या नात्याला मिळालेली शेवटची संधी समजा.”

घटस्फोटासाठी अर्ज केल्यावर जीवा-नंदिनी बाइकने घरी जायला निघतात. इतक्यात पाऊस पडू लागतो. यावेळी बाईकवरून उतरून आडोशाला उभी राहायला जात असताना नंदिनीचा तोल जातो आणि जीवा तिला सावरतो. खरंतर, त्याला आता नंदिनीला घटस्फोट द्यायचा नसतो त्यामुळे हा पाऊस नंदिनी-जीवाच्या नात्याला वेगळं वळण देईल का? शेवटच्या ६ महिन्यांत जीवा त्याचं प्रेम सिद्ध करेल का? जीवा-काव्याच्या लग्नाआधीच्या अफेअरचं सत्य नंदिनीला कळेल का? या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका रोज संध्याकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केली जाते.