Lagnanantar Hoilach Prem Promo : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाचा सीक्वेन्स चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याने लग्न मोडण्यासाठी घटस्फोटासाठी अर्ज केलेला आहे. आता दोन्ही जोडप्यांकडे लग्न टिकवण्यासाठी फक्त ६ महिने आहेत. आता पुढच्या सहा महिन्यांत गोष्टी कशा बदलणार? जीवा-नंदिनी, पार्थ-काव्या त्यांच्या नात्याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

आता मालिकेत दोन्ही जोडप्यांमध्ये हळुहळू मैत्रीचं नातं निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. याची सुरुवात होते एकमेकांचे रूममेट्स होण्यापासून…मालिकेत लग्न झाल्यापासून पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनी एकमेकांबरोबर रूम शेअर करत नसतात. पार्थ तर काव्याला मनस्ताप नको म्हणून सुरुवातीचे काही दिवस हॉलमध्ये विश्रांती घेत असतो पण, आता त्यांच्या नात्यावर घरातील अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर दोन्ही जोडप्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनी एकमेकांचे रूममेट्स झाले आहेत. पण, यात काही अटी असतील… खोलीत आपण फक्त रूम पार्टनर असू आणि बाहेर सगळ्यांसमोर खोटा भातुकलीचा संसार घेऊन वावरावं लागेल. असं काव्या पार्थला सांगते. बेडच्या मध्यभागी कायम अंथरुणाचा मोठा रोल असेल आणि हे नियम व अटी इतर कोणालाही कळायला नकोत असं नंदिनी जीवाला सांगते.

जीवा आणि नंदिनीमध्ये मैत्री झाल्यावर आता दोघांमध्ये निर्माण झालेला आणखी एक गैरसमज दूर होणार आहे. जीवाचं पत्र वाचून नंदिनीने घटस्फोटाचा निर्णय घेतलेला असतो. मात्र, ते पत्र तुझ्यासाठी नव्हतंच असा खुलासा अखेर जीवाने बायकोसमोर केला आहे. हे ऐकून नंदिनीचे डोळे पाणावतात…यावरून जीवाला नंदिनीला सुद्धा घटस्फोट नको आहे ही गोष्ट सहज लक्षात येते.

नंदिनी जीवाला म्हणते, “तुमचं याआधीचं पत्र वाचून प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं होतं. काय तर म्हणे आपण वेगळं होऊ वगैरे-वगैरे…” यावर जीवा म्हणतो, “अगं ते चुकीचं पत्र वाचलंस तू…. एक मिनिट म्हणजे तुला घटस्फोट नकोय”

जीवाचं बोलणं ऐकून नंदिनीचे डोळे पाणावतात ती लगेच म्हणते, “याचा अर्थ तुम्हालाही घटस्फोट नकोय?” आपण गैरसमज करून घेतला याची जाणीव तिला होते. आता दोघांच्या नात्यात कोणतं नवीन वळण येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

दरम्यान, जीवा-नंदिनीमधील घटस्फोटाचा गैरसमज अखेर दूर होणार हा प्रोमो पाहून प्रेक्षक खूश झाले आहेत. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केली जाते.