Lagnanantar Hoilach Prem Upcoming Twist: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेत सतत येणारे ट्विस्ट, पात्रे यांमुळे ही मालिका प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसत आहे.

लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत दाखविल्याप्रमाणे, नंदिनी व जीवा आणि काव्या व पार्थ यांची लग्ने एका वेगळ्या परिस्थितीत मनाविरुद्ध झाली. लग्नानंतर गोष्टी जुळवून घेण्यास त्यांना अडचणी आल्या. काव्याने घटस्फोट व्हावा यासाठी अनेक प्रयत्न केले. अनेक गैरसमजही झाले. ते इतके वाढले की, त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केले.

आता त्यांना सहा महिने एकत्र राहण्यास सांगितले आहे. दरम्यानच्या काळात त्यांच्यात थोडी मैत्री झाली आहे. त्यांनी एकत्र येत वसूआत्याचे कारस्थान सर्वांसमोर उघड केले. त्यांना शिक्षाही दिली. आता त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत पुढे काय घडणार?

स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, नंदिनी श्रीगणेशाची मूर्ती घेऊन आली आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात इतर महिलांच्याबरोबर ती येते. जीवा औक्षण करतो. श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. दोघे एकत्र गणपती बाप्पाची आरती करतात.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, आरती करताना काव्या व पार्थ यांना एकमेकांचा धक्का लागतो. ते एकमेकांकडे पाहतात. हा प्रोमो शेअर करताना बाप्पााच्या आशीर्वादाने होणार का नात्यांचा श्री गणेशा?, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकरी काय म्हणाले?

हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रोमोवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. “जीवा नंदिनी”, “काव्या पार्थच्या नात्याचा नक्की श्री गणेशा होणार”, “काव्या किती गोड दिसते”, “नंदिनी आनंद निवासचा गणपती आणते आहे आणि जीवा औक्षण करतो, हा बदल किती छान वाटला”, “काव्यार्थ”, “जीवा नंदिनी ही खूप क्यूट जोडी आहे”, “जीवा नंदिनी खूप छान दिसत आहेत, त्यांना नजर नको लागायला”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

तर काहींनी गमतीने लिहिले, “तो धक्का मुद्दाम मारला गेला का? पार्थ प्रयत्नशील आहेच”, “होणार, होणार, काव्या आणि पार्थ”, अशा कमेंट करत हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

आता मालिकेत पुढे काय होणार, काव्या व पार्थ तसेच जीवा व नंदिनी यांची आयुष्ये पुढे कशी वळण घेणार, तसेच ते एकमेकांच्या कधी प्रेमात पडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.