Lagnanantar Hoilach Prem Promo : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्या हे चौघंही मिळून सध्या वसु आत्याचं कारस्थान कसं उघड करायचं यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच नंदिनीने तिच्या किडनॅपिंगचं सत्य देशमुख कुटुंबीयांना सांगितलं. यावेळी वसु आत्या दीपकला हाताशी घेऊन नंदिनीला सर्वांसमोर खोटं पाडते. विक्रम देशमुख सुद्धा बहिणीवर विश्वास ठेवून नंदिनीला बरंच काय-काय बोलतात.

वसुंधरा, विक्रम, रम्या हे सगळेच नंदिनीच्या विरोधात जातात, तिला घालूनपाडून बोलतात. यावेळी मानिनी आपल्या सुनेच्या बाजूने ठामपणे उभी राहते. ती नंदिनीविरोधात एक शब्दही ऐकून घेत नाही. इतकंच नव्हे तर जीवा सुद्धा बायकोला खंबीरपणे साथ देतो. घरातील हे सगळे वाद पाहून आता काहीही झालं तरी नंदिनी ताईला न्याय मिळवून द्यायचा असं पार्थला सांगते. हे चौघंजण मिळून आत्याबाईंविरोधात पुरावे शोधू लागतात. यादरम्यान रम्या अनेक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करते. पण, आता चौघंही अलर्ट मोडवर असतात आणि नव्याने पुरावे शोधू लागतात.

यानंतर सँडीने दिलेल्या गुन्ह्याच्या कबुलीचं रेकॉर्डिंग मिथून काका वसु आत्यांसमोर दाखवतात. आपलं कारस्थान उघड झालंय हे समजल्यावर वसुच्या पायाखालची जमीन सरकते. आता आपल्याला घराबाहेर जावं लागेल या विचाराने वसु आत्या आणि रम्याला अश्रू अनावर होतात. दोघीही रडण्याचं नाटकं करायला सुरुवात करतात.

वसु आत्या म्हणते, “नंदिनी मला माफ कर…मी जी चूक केलीये त्यासाठी मला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिलेली नाहीये.”

यानंतर इतके दिवस शांत असलेली नंदिनी रौद्ररुप धारण करते; ती म्हणते, “बरोबर बोललात! म्हणूनच आम्हाला तोंड सुद्धा दाखवायचं नाही. आम्ही फक्त बाबांचा विचार करतोय म्हणून… आता इथून पुढे या घरात राहायचं असेल तर तोंड खाली घालून राहावं लागेल. मान खाली म्हटलं मी”

दरम्यान, नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “याची कित्येक दिवस वाट बघत होतो”, “लय भारी असंच हवं या वसु आत्याला”, “वसु आत्या आणि रम्याला बाहेर हाकलून द्या हीच चांगली शिक्षा आहे”, “मृणाल दुसानिस कमाल अभिनय केलाय…स्टार ऑफ टीव्ही”, “मृणाल जबरदस्त” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.