Lakhat Ek Aamcha Dada fame Disha Pardeshi’s New Project : इंडस्ट्रीतील बरेच कलाकार अभिनयासह निर्मिती क्षेत्रातही कार्यरत असतात आणि त्यामार्फत ते वेगवेगळ्या कलाकृतींची निर्मिती करीत असतात. अशातच आता अजून एका मराठी अभिनेत्रीने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्री दिशा परदेशीने निर्मिती क्षेत्रात तिचं पहिलं पाऊल टाकलं आहे. अभिनेत्रीनं आजवर चित्रपट व मालिकांत काम केलं होतं. अशातच आता ती एका नवीन कलाकृतीची निर्मिती करणार आहे. काही दिवसांपूर्वी दिशानं सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करीत याबद्दलची माहिती दिली होती. अशातच आता तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत तिच्या कलाकृतीचं नाव काय आहे याचा खुलासा केला आहे.
दिशानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये तिच्या हातात क्लॅप (Clap) असल्याचं दिसत आहे. तिच्या निर्मिती संस्थेचं नाव ‘युनिटी कल्चर प्रॉडक्शन्स’ असं आहे. दिशा व आरुष राजे यांनी ही निर्मिती संस्था सुरू केली आहे. आरुष राजेसुद्धा अभिनेता असून, आता दिशा व आरुष निर्माते म्हणूनही काम करणार असल्याचं त्यांच्या या पोस्टमधून कळतं. ‘युनिटी कल्चर प्रॉडक्शन्स’ या निर्मिती संस्थेच्या सोशल मीडिया पेजवरून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
दिशा परदेशीची निर्मिती असलेल्या कलाकृतीचं नाव काय?
दिशा परदेशी निर्मिती करीत असलेल्या कलाकृतीचं नाव ‘वर वरचे स्वयंवर’ असं असून, ही कलाकृती ‘झी ५’वर प्रदर्शित होणार असल्याचं या पोस्टमधून पाहायला मिळतं. त्यामुळे आता दिशा अभिनेत्रीप्रमाणेच निर्मातीही झाली आहे. ही गुड न्यूज तिनं सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकांनी या पोस्टखाली तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, दिशाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिनं ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका साकारलेली. परंतु, आरोग्याच्या समस्यांमुळे तिनं अर्ध्यातच या मालिकेतून एक्झिट घेतली. या मालिकेपूर्वी तिनं ‘प्रेम पहिलं वहिलं’, ‘मन फकिरा’ या चित्रपटांत काम केलं होतं. ‘प्रेम पहिलं वहिलं’मध्ये तिच्यासह अभिनेता संजय सेजवालही झळकला होता; तर ‘मन फकिरा’मध्ये ती अभिनेत्री पूजा सावंत, पुष्कर जोग या कलाकारांसह झळकली होती. पुष्कर जोगनंच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.